चीन, पाकिस्तानवरील हल्ल्याची तारीख मोदींनी ठरवली?

भाजपाच्या उत्तर प्रदेश प्रमुखांचे वादग्रस्त वक्तव्य

बलिया – ज्याप्रमाणे देशाचे सर्वात लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलम 370 हटवण्याची तारीख निश्‍चित केली होती; नंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राममंदिर भूमीपूजनाची तारीख ठरवली, त्याचप्रमाणे भारताने चीन आणि पाकिस्तानवर केव्हा हल्ला करायचा, याची खूणगाठही मोदींनी मारुन ठेवलेली आहे. त्यानुसार ते आपल्या निर्णयाची अंमलबाजवणी करतीलच, असे विधान भारतीय जनता पक्षाचे उत्तर प्रदेश अध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनी केले आहे. स्वतंत्र देव सिंह यांच्या या विधानाने खळबळ माजली आहे.

राम मंदिर आणि कलम 370 कलमांबाबतच्या निर्णयांप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तान आणि चीन यांच्यात युद्ध कधी होईल, याबातचा निर्णय घेतला आहे, असे सोशल मीडियावर एका व्हिडिओ क्‍लिपमध्ये सिंह बोलताना ऐकू येते.

“संबन्धित तीथी तय है (तारीख ठरली आहे),’ असे ते हिंदीमध्ये म्हणाले आहेत. हा व्हिडिओ प्रसिद्ध करणारे भाजपचे आमदार संजय यादव यांच्या घरी श्री सिंह बोलत होते. भारत आणि चीनमधील “प्रत्यक्ष ताबारेषेबात’ (लाईन ऑफ ऍक्‍च्युअल कंट्रोल- एलएसी) निर्माण झालेला वाद आणि पाकिस्तानकडून सातत्याने केले जाणारे घुसखोरीचे प्रयत्न या पार्श्‍वभूमीवर स्वतंत्र देव सिंह यांचे वक्तव्य गांभीर्याने घेतले जात आहे.

आपल्या भाषणात सिंह यांनी समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांची तुलना अतिरेकी म्हणून केली. या टीकेबद्दल विचारले असता स्थानिक खासदार रवींद्र कुशवाहा म्हणाले की, उत्तर प्रदेश अध्यक्षांनी कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी असे वक्तव्य केले असावे.

आता भाजपाच्या उच्चपदस्थ नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरली असून जवळपास प्रत्येकच जबाबदार नेत्याला सारवासारव करावी लागत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. स्वतंत्र देव सिंह यांनी दिलेल्या वक्तव्यामुळे भारताच्या भूमिकेचा भंग झाल्याचे मानले जात आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.