सोशल तरुणाई

तंत्रज्ञानाच्या प्रसारामुळे जगातील अब्जावधी लोकांच्या जीवनामध्ये फार वेगाने बदल घडताना आपण पाहतो आणि अनुभवतो आहोत. या सर्व प्रकारच्या तंत्रज्ञानामध्ये माहिती आणि संवादाचे तंत्रज्ञान सर्वांत आघाडीवर आहे. यामुळे परस्परांशी गतिशील संवादही होऊ शकतो. अशा प्रकारे सर्व जग जोडले जाऊन ग्लोबल व्हिलेज ही संकल्पना प्रत्यक्षात उतरली आहे.

इंटरनेट ही चैनीची बाब नसून, एक अत्यावश्‍यक घटक बनत चालली आहे. घराबाहेर पडताना पूर्वी घरातील मंडळी आपल्याला विचारत असत, रुमाल घेतला का? पाकीट व्यवस्थित आहे ना? आता त्यात अजून काही गोष्टींची भर पडली आहे. मोबाईल, लॅपटॉप आता त्याच यादीत आले आहेत. जन्मापासून संगणकीय युगातच वावरणारी म्हणजे साधारण 1995 नंतर जन्मलेली मुले-मुली यांच्या इंटरनेटकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात मूलभूत फरक असणार आहेच. त्यांच्या संभाषणाच्या, गप्पा मारायच्या, संवादाच्या कल्पना पूर्णपणे वेगळ्या आहेत. अशा व्यक्ती इंटरनेटला आपल्या मानसिक व बौद्धिक क्षमतांचे एक एकात्मिक, विस्तारित अंगच मानतात. आभासी अनुभवांच्या विश्‍वाचे तर इंटरनेट हे प्रवेशद्वारच आहे.

आभासी अनुभव घेण्याच्या शक्‍यतेमुळे मानवी मेंदूच्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये विलक्षण फरक पडला आहे. इंटरनेटची वाजवी किमतीतील सहज उपलब्धता, स्मार्टफोन्स आणि आकर्षक डेटा प्लॅन्स यामुळे सोशल मीडियाच्या वापरामध्ये झपाट्याने वाढ होत आहे. युवा पिढीबरोबरच अनुभवी व्यावसायिकही या नवीन कार्यसंस्कृतीत सहभागी होत आहेत. मोबाईल, आय फोनसारख्या सतत बदलत्या उपकरणांतील अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे ही प्रक्रिया सतत बदलती व सुटसुटीत होत आहे. व्यावसायिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी कंपन्यांकडून या नेटवर्किंगचा फार मोठया प्रमाणात उपयोग केला जाईल. ग्राहकाला माहिती देण्याची सध्याची मानसिकता बदलून ती संवादाकडे नेण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न उद्योगविश्‍वाकडून केला जात आहे. तंत्रज्ञानामुळे उपलब्ध झालेल्या संपर्क सुविधांमुळे एरवी आत्मकेंद्रित झालेला समाज आता हळूहळू बोलायला लागला आहे. सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला विषय म्हणजे निवडणुका-त्यावरही संगणकीय तंत्र आणि उपकरणांनी स्वत:चा ठसा उमटवला आहे. प्रत्यक्ष मतदानापासून विजयी उमेदवाराबाबतचे अंदाज वर्तवण्यापर्यंतच्या अनेक पैलूंमध्ये हे तंत्रज्ञान समाविष्ट झालेले आढळते. सर्वच उमेदवारांच्या मतदानाआधीच्या प्रचाराची धामधूम आता सोशल मीडियामुळे चांगलीच बदलली आहे! उमेदवाराची प्रतिमा, त्याने केलेली विधाने या बाबींना एफबी आणि ट्विटरवर जास्तीत जास्त लाइक्‍स आणि शेअरिंग मिळविणे हे प्रत्यक्ष मिरवणुका, पोस्टर आणि हॅंडबिलांइतकेच किंवा त्यांपेक्षाही महत्त्वाचे मानले गेले आहे.

स्मार्टफोन आणि इतर तंत्रांच्या प्रसाराच्या विलक्षण वेगामुळे हे शक्‍य झाले आहे. संगणकीय तंत्राचा एक नवीन आविष्कार या वेळी पाहायला मिळाला आहे. मतदारांचा आर्थिक-सामाजिक-शैक्षणिक स्तर तसेच वयोगटाबाबतची माहिती एकत्रितपणे देणारे नकाशे दाखविणे व मुख्य म्हणजे ते एकमेकांवर ठेवून पाहणे शक्‍य झाले आहे. भारतातील तरुणाई या सोशल मीडियाचा सर्वाधिक वापर करीत आहे. सोशल मीडियाच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे इथे वेगवेगळ्या प्रकारच्या रोजगाराच्या संधीही दिवसागणिक निर्माण होत आहेत. विविध प्रकारची सॉफ्टवेअर, अँप, साइट यांच्या निर्मितीचा आणि तदनुषंगिक उत्पादनांचा व्यवसाय सध्या तेजीत आहे. सोशल मीडिया ही एक ताकदच सर्वसामान्य वाचकांना लाभली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.पण, या माध्यमाचा गैरवापरही होताना आढळून येत आहे. काही प्रसिद्ध व्यक्तींच्या निधनाच्या अफवा, खोट्या बातम्या या माध्यमाच्या शक्तीबद्दल संभ्रमाचे वातावरण निर्माण करीत आहेत. त्यातच आता विघातक शक्ती फूट पाडून, दंगली, हिंसाचार घडविणे हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून खोट्या क्‍लिप्स दाखवत आहेत. चलत्चित्रणात बदल करून आपल्याला हवे ते चित्रण निर्माण करणे व चित्रे अदलाबदल करून विपर्यास व भडक दृश्‍ये अशा साईटवर टाकणे, हा आता काही समाजकंटकांचा पूर्णवेळ उद्योग झाला आहे. यावर उपाययोजना करणे अवघड आहे. देशातील सायबर कायदे सक्षम आहेत; पण त्यांची अंमलबजावणी वेळखाऊ आहे. काही अपवादात्मक बाबींत त्वरित अटक झालीही आहे.अस्तित्वात असलेल्या मानवी नातेसंबंधांचा दर्जा व खुमारी वाढविण्यासाठी तंत्रज्ञान वापरणे हेच केव्हाही श्रेयस्कर.

– भगवान केशव गावित

Leave A Reply

Your email address will not be published.