नवी दिल्ली – उपहार आग प्रकरणात दिल्ली न्यायालयाने सुशील अन्सल आणि गोपाल अन्सल यांना पुराव्यांशी छेडछाड केल्याबद्दल सात वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तसेच प्रत्येकी 2.5 कोटी रुपयांचा दंडही ठोठावला आहे. न्यायालयाने माजी न्यायालयीन कर्मचारी दिनेश चंद शर्मा, पीपी बत्रा आणि अनूप सिंग यांनाही सात वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
– न्यायालयाने 5 जणांना दोषी ठरवले होते
8 ऑक्टोबर रोजी पटियाला हाऊस कोर्टाने उपहार सिनेमा आग प्रकरणात पुराव्यांशी छेडछाड केल्याप्रकरणी सुशील आणि गोपाल अन्सल बंधूंसह पाच जणांना दोषी ठरवले होते. या प्रकरणी अन्सल बंधूंसह कोर्टाचे माजी कर्मचारी दिनेशचंद शर्मा आणि पीपी बत्रा आणि अनूप सिंग यांना न्यायालयाने दोषी ठरवले होते.
– आगीत 59 प्रेक्षकांचा मृत्यू
दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आयपीसी कलम 120-बी, 109, 201 आणि 409 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही घटना 13 जून 1997 रोजी दिल्लीतील उपहार सिनेमात बॉर्डर या हिंदी चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान घडली होती. या आगीच्या घटनेत 59 प्रेक्षकांचा मृत्यू झाला होता. उपहार ट्रॅजेडी व्हिक्टिम्स असोसिएशन (AVUT) च्या अध्यक्षा नीलम कृष्णमूर्ती यांनी उच्च न्यायालयात हा खटला दाखल केला होता.