आमदार भरणेंकडून डॉक्टर्स फैलावर : इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाविरोधात तक्रारींचा पाढा
रेडा- इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिक व शहरातील पदाधिकारी यांनी उपजिल्हा रुग्णालयातील होणारी रुग्णांची हेळसांड, उपजिल्हा रुग्णालयातील रुग्ण खासगी दवाखान्यांमध्ये दाखल करून लुबाडल्या जाणाऱ्या रकमा यासंदर्भात थेट तक्रारी आमदार दत्तात्रेय भरणे यांच्याकडे केल्या होत्या. याच तक्रारींना न्याय देण्यासाठी विशेष बैठक आयोजित करून तज्ज्ञ डॉक्टरांना जनतेसमोर आमदार भरणे यांनी फैलावर घेतले. जर कामात सुधारणा होत नसतील गोरगरिबांवर उपचार होत नसतील तर बाहेरचा रस्ता दाखवला जाईल, असा इशारा आमदार भरणे यांनी यावेळी दिला.
उपजिल्हा रुग्णालय इंदापूर येथे आमदार भरणे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक आयोजित केली होती. यावेळी जिल्हा आरोग्य उपसंचालक डॉ. संजय देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापुरकर, तहसीलदार सोनाली मेटकरी, नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, बांधकाम विभागाचे साळुंखे, अधिकारी उपस्थित होते.
भरणे म्हणाले की, काशीला जाण्यापेक्षा रुग्णांची सेवा करण्यात जी मजा आहे ती काशीला जाण्यात नाही हे लक्षात ठेवले पाहिजे. खऱ्या अर्थाने गोरगरीब उपेक्षित नागरिकांची सेवा करण्याचा धर्मा वैद्यकीय सेवा देणाऱ्यांनी मनापासून पाळावा तरच आपल्या पदाला किंमत असेल.आलेल्या रुग्णांना प्रेमाने बोला त्यांचा आजार बरा झालेला दिसेल,जर रुग्णांची हेळसांड कराल तर खपवून घेणार नाही. ग्रामीण भागातील उपेक्षित कुटुंबातील महिला प्रसुतीसाठी उपजिल्हा रुग्णालयांमध्ये येत असतात त्यांना सर्व मोफत उपचार दिले जावेत व जन्मलेल्या बालकांना मोफत सेवा व उपचार देण्यात नियमानुसार आलाच पाहिजे अशाही सूचना आमदार भरणे यांनी या बैठकीत दिल्या.
उपजिल्हा रुग्णालयचे अधीक्षक रुग्णालयात निवासी राहतील, स्थानिक संस्था रुग्णालयाला मदत करतील, रुग्णाकल्याण समितीने आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी आढावा बैठक घ्यावी, नगपरिषद, पंचायत समिती, बांधकाम विभाग यांनी रुग्णालयातील सुविधा रुग्णांना देण्यासाठी रुग्णालयाला हातभार लावावा. जर स्थानिक पातळीवर व जिल्हा पातळीवर हे प्रश्न सुटले नाहीत तर आम्हांला सांगा,असा थेट आदेश आमदार दत्तात्रय भरणे दिला.
उपजिल्हा रुग्णालयात प्रसूती झालेल्या महिलांच्या बालकांना, कावीळ व आजारा झाले असल्याची मातांना भीती घालून, खाजगी रुग्णालयात त्या बालकांचे उपचार करून गरिबांना हजारो व लाखो रुपयांची लुबाडणूक करणाऱ्या डॉ. नामदेव गार्डे यांची एका सक्षम पथकाकडून चौकशी करून, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी अनेक कार्यकर्त्यांनी या बैठकीत केली.
मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल म्हणाले की, रुग्णालयाला आधीच 12 नळ कनेक्शन दिले आहेत. पाणी नाही असे आरोप करणाऱ्या अधिकाऱ्यांना अजून कोठे नळ जोडणी करून देवू, ते त्यांनी सांगावे. त्यांना तात्काळ नळ जोडणी करून देण्यात येईल. ड्रेनेज लाईन स्वच्छ करून देण्यात येईल, अशी ग्वाही डॉ. ठेंगल यांनी दिली.
यावेळी रुग्णालयातील सुविधांबाबत रुग्णकल्याण समितीने आठवड्यात प्रत्येक सोमवारी आढावा बैठक घेण्याचे ठरले आहे. बाळासाहेब ढवळे यांच्या अध्यक्षतेखाली ती बैठक होणार आहे. महिन्यात केव्हाही दोनवेळा रुग्णालयाची पाहणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापुरकर करतील, असे आदेश आरोग्य उपसंचालक डॉ. संजय देशमुख यांनी दिले.