नवी दिल्ली – यशस्वी अंतराळ मोहिमांमुळे जगभर ख्याती असलेल्या इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने 2022च्या ‘मिशन गगनयान’ची जोरदार तयारी सुरू केली आहे. या मोहिमेद्वारे 4 अंतराळवीर अवकाशात झेपावणार आहेत. त्यांच्यासाठी खास पोशाख अर्थात सुट तयार केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रशिया येथील एका प्रयोगशाळेत या अंतराळवीरांसाठी खास सुट तयार करणे प्रगतीपथावर आहे. हे सुट तब्बल 250 अंश सेल्सियस तापमानात देखील या अंतराळवीरांचे रक्षण करू शकतील. या सूटच्या परीक्षणासाठी भारताचे 4 अंतराळवीर सध्या मॉस्को येथे आहेत.
सूट निर्मितीसाठी इस्रोने रशियन अंतराळ संस्था ‘ग्लाव्हकॉसमॉस’सोबत करार केला आहे. या अंतर्गत हा सुट तयार करणे सुरू आहे. सुमारे 10 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त बजेट असलेली मोहीम संपूर्ण जगासाठी कुतूहलाचा विषय ठरत आहे.
अंतराळवीरांसाठी तयार केल्या जात असलेल्या या सूटमध्ये श्वास-उच्छवासातील कार्बन डायऑक्साइड बाहेर फेकण्याचे उपकरण, बॅकपॅक, बॅकपॅकमध्ये वीजनिर्मिती उपकरण, अंतराळवीरांना पुरेसा ऑक्सिजनपुरवठा होण्यासाठी विशिष्ट प्रकारचा फॅन, पाणी साठवण्यासाठी जागा, याशिवाय अंतराळवीरांच्या शरीराचे तापमान नियंत्रित करण्याची यंत्रणा बसवली जाणार आहे.