पुणे – शहरात करोनाचा संसर्ग वाढल्याने महापालिका प्रशासनाकडून विविध रुग्णालयांसह महापालिकेच्या शाळांमध्ये करोना टेस्ट घेण्यात येत आहेत. मात्र, यापुढे बसमध्येही करोना टेस्ट घेतली जाणार आहे. याबाबतचा सामंजस्य करार महापालिका आणि “क्रस्ना डायग्नोस्टिक सेंटर’ यांच्यात झाला आहे. या अत्याधुनिक बसचे लोकार्पण बुधवारी सकाळी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले.
करोनाचा संसर्ग शहारातील विविध झोपडपट्ट्या आणि दाट लोकवस्त्यांमध्ये झाल्याने तो आटोक्यात आणण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून विविध उपाय योजना केल्या जात आहेत. शहरातील विविध रुग्णालयांमध्ये करोनाच्या चाचण्या घेतल्या जात होत्या.
आता या बसद्वारेही चाचण्या घेतल्या जाणार आहेत. यावेळी महापालिकेच्या अति. आयुक्त रुबल अग्रवाल, शांतनू गोयल, सेंटरच्या संचालिका पल्लवी जैन, कार्यकारी उपाध्यक्ष अनिल साळुंखे, आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. अंजली साबणे आदी उपस्थित होते. दरम्यान, या माध्यमातून अत्याधुनिक वातानुकूलित फिरत्या बसमध्ये कोविड 19 स्वॅब संकलन, मोबाइल एक्स-रे, रक्त चाचणी, रक्तदाब आदी तपासण्या करण्यात येणार आहेत.