अत्यावश्यक सेवेचा अनागोंदी कारभार : माहिती संकलनासाठी लागतोय महिना
पुणे – स्मार्ट शहर म्हणून मिरवणाऱ्या पुणे महापालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागाची आकडेवारी “अपडेट’च नसल्याचा प्रकार समोर आला आहे. शहरात दररोज किती जन्म आणि किती मृत्यू होतात, या माहिती संकलनासाठी महापालिकेस एक-दीड महिन्यांचा कालावधी लागतो. अत्यावश्यक असलेल्या या विभागाची माहितीच “अपडेट’ नसल्याने प्रशासनाच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
तब्बल 45 लाख लोकसंख्या असलेल्या पुणे शहरात दररोज काही मृत्यू तसेच जन्म होतात. याची माहिती एका क्लिकवर दररोज उपलब्ध होणे आवश्यक आहे. मात्र, तशी कोणतीही यंत्रणा अद्याप विकसित करण्यात आलेली नाही. शहरात शासकीय तसेच महापालिकेच्या रुग्णालयात जन्म झालेल्या बाळांची माहिती 21 दिवसांत महापालिकेस देण्याचे बंधन या हॉस्पिटलला आहे. त्यामुळे हॉस्पिटल्स आपल्या सोयीनुसार ही माहिती पालिकेस कळवतात. त्यानंतर पालिकेची क्षेत्रीय कार्यालये आणि तिथून ती जन्म-मृत्यू कार्यालयात येण्यास आणखी कालावधी जातो. नंतर ही माहिती दाखले देण्यासाठी “अपडेट’ केली जाते. अशीच स्थिती शहरात होणाऱ्या मृत्यू संख्येची आहे.
एखाद्याचा रुग्णालयात मृत्यू झाल्यानंतर अर्जाचे सोपस्कर पूर्ण करून संबंधित व्यक्तीचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला जातो. तर, व्यक्ती 65 वर्षांपुढील असल्यास नगरसेवक संबंधित व्यक्तीच्या नातेवाईकांना मृत्यू पास देतात.
त्यानंतर त्यांची नोंदणी स्मशानभूमी पाससाठी केली जाते. नंतर अंत्यसंस्कार केले जातात. ही माहितीही हॉस्पिटल तसेच पास केंद्र तसेच क्षेत्रीय कार्यालयांकडून दोन ते तीन आठवडे जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयास दिलीच जात नाही. परिणामी, शहरात होणाऱ्या मृत्यूचे रेकॉर्ड “अपडेट’ होण्यासाठी दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागतो.
ऑनलाइन कारभाराचे वावडे
पालिकेचे कामकाज गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी ऑनलाइन यंत्रणा विकसित करण्यात येत आहेत. मात्र, जन्म-मृत्यू नोंदणी विभागाला ऑनलाइन कारभाराचे वावडे असल्याचे चित्र आहे. शहरात कोणताही जन्म अथवा मृत्यू झाल्यानंतर त्याची “अपडेट’ माहिती संबंधितांनी ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून तातडीने पालिकेस कळवणे आवश्यक आहे. त्यामुळे जन्म आणि मृत्यूची प्राथमिक माहिती पालिकेस एका क्लिकवर उपलब्ध होईल. पण, अशी कोणतीही यंत्रणा पालिकेने विकसित केलेली नाही. त्यामुळे या विभागाचा कारभार अजूनही कागदी घोड्यांवरच सुरू आहे. नागरिकांना दाखले ऑनलाइन देण्यासाठीही यापूर्वी पालिकेने यंत्रणा विकसित केली होती. मात्र, ती अडगळीत गेली आहे. तर माहितीच “अपडेट’ होत नसल्याने ऑफलाइन दाखले मिळवण्यासाठी या विभागाचे उंबरे झिजवावे लागत आहेत.
शहरात झालेले जन्म तसेच मृत्यूच्या नोंदी खासगी रुग्णालयाकडून उशिरा दिल्या जातात. तसेच अद्याप पास केंद्रांमध्ये ऑनलाइन सुविधा नाही. त्यामुळे माहिती अपडेट होण्यास वेळ लागत आहे. यावर तोडगा काढण्यात येणार असून, या माहितीसाठी संगणक प्रणाली विकसित करण्याबाबत चर्चा सुरू आहे. मात्र, तोपर्यंत दररोजची माहिती संकलित करण्यासाठी उपाययोजना केल्या जातील.
– डॉ. कल्पना बळीवंत, जन्म-मृत्यू नोंदणी विभाग प्रमुख.