समुपदेशक विद्यार्थ्यांना करणार मार्गदर्शन

पुणे : करोनाच्या विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे विद्यार्थ्यांसह पालक शैक्षणिक परिस्थितीबद्दल संभ्रमात आहेत. अशा वेळेस विद्यार्थ्यांच्या विविध समस्या तसेच करिअर विषयक मार्गदर्शन करण्यासाठी समुपदेशकाच्या सेवा मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यानुसार पुणे जिल्ह्यासाठी 42 समुपदेशकांची नियुक्‍ती करण्यात आली असून, ते विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करणार आहेत.

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जगात अस्थिरता निर्माण झाली आहे त्याचा परिणाम इतर घटकांबरोबर शालेय व्यवस्था, विद्यार्थी आणि पालकांवरही झाला आहे. यावर उपाययोजना म्हणून महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्यामार्फत राज्यातील 403 शिक्षक – समुपदेशक यांची सेवा विद्यार्थी व पालकांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहेत. याबाबतचे परिपत्रक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक दिनकर पाटील यांनी 30 एप्रिल रोजी काढले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सद्यस्थितीला राज्यातील सर्व शाळा व महाविद्यालय बंद आहेत.

अशा वेळेस विद्यार्थ्यांच्या विविध समस्या तसेच करिअर विषयक मार्गदर्शन करण्यासाठी समुपदेशक सेवा बजावणार आहेत. यात पुणे जिल्ह्यातील एकूण 42 समुपदेशक असून ते जिल्ह्यातील विद्यार्थी व पालकांना विविध विषयांवर मार्गदर्शन व समुपदेशन करतील. सकाळी 10 ते 5 या वेळेत भ्रमणध्वनीद्वारे जिल्ह्यातील विद्यार्थी व पालक समुपदेशकांची संपर्क साधू शकतात.

करोनामुळे निर्माण झालेल्या विद्यार्थी व पालकांच्या मनातील संभ्रम अवस्था दुर करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वच समुपदेशक नक्कीच प्रयत्नशील राहतील. या समुपदेशकांच्या मार्गदर्शन व समुदेशन सेवेचा राज्यातील विद्यार्थी व पालकांना नक्कीच फायदा होईल.
भगवान पांडेकर
शिक्षक समुपदेशक, पुणे

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.