राजगुरूनगर जवळ असलेल्या पुलातून पाण्याची गळती

राजगुरूनगर : चास कमान धरणाच्या डाव्या कालव्यातुन राजगुरूनगर जवळ असलेल्या पुलातून पाण्याची मोठी गळती सुरु झाली असून कालवा फुटण्याची मोठी भीती निर्माण झाल्याने चासकमान धरणातून सोडण्यात येणारे उन्हाळी आवर्तन बंद करण्यात आले आहे. राजगुरूनगर शहराजवळील शनिवारी चासकमान धरणाच्या डाव्या कालव्याला अचानक मोठी गळती सुरू झाली आहे. तालुका क्रीडा संकुल जवळ तिन्हेवाडी कडुन येणाऱ्या ओढ्यावर असलेल्या पुलाच्या बांधकामातून ही गळती होत आहे. गळतीमुळे कालव्यातून पाणी वाया जात असून माती भरावाच्या संरक्षक बांधकाम असलेल्या पुलाला यामुळे धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

गळतीची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून कालव्याचे आवर्तन आज दुपारी दोन वाजता कमी-कमी करत बंद करण्यात आल्याची माहिती चासकमान पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब शेटे यांनी दिली.दोन वर्षांपूर्वी याच ठिकाणी दक्षिण बाजूने कालव्याला भगदाड पडुन मोठ्या प्रमाणात पाणी वाहुन शेतीचे नुकसान झाले होते. मागील वर्षी त्यापुढे डाक बंगल्याजवळ मोठ्या प्रमाणात गळती होत होती ती आजही आहे. त्याजवळील पुलावरही मोठी गळती होत आहे. याकडे चासकमान धरण प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. गेली काही वर्षांपासून कालव्यात पाणी सोडल्यानंतर मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी मोठी पाण्याची गळती होत आहे.

कालव्याची दुरुस्ती होत नसल्याने कालव्याजवळील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असताना कालव्याचे पाणी वाया जात आहे.
गेली काही वर्षांपासून राजगुरूनगर शहराजवळील पुलाच्या पिलरमधून गळती होत आहे. शनिवारी सकाळी राजगुरूनगरच्या उत्तरेला क्रिडा संकुलजवळ पुलाच्या भराव्याच्या बांधकामातून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असल्याचे शेतकऱयांनी गस्तीवर असलेल्या रामदास लगड व सुनील सातकर यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. सहाय्यक अभियंता पी. बी शिंदे, शाखा अभियंता एस.  एम शिंदे हे तातडीने घटनास्थळी आले.

चासकमान धरणाच्या डाव्या कालव्यात साडेपाचशे क्यूसेक वेगाने १७ मार्चला उन्हाळी आवर्तन सुरु करण्यात आले. ४५, ४५ असे ९० दिवसांचे १५ जून पर्यंत चालणारे हे आवर्तन आहे. सध्या धरणात २.८५ टीएमसी म्हणजेच ३८ टक्के पाणी शिल्लक आहे. चासकमान धरणाचा डावा कालवा खेड तालुक्यात ७२ किलोमीटर अंतर वाहतो. १९७७ ते ८५ च्या कालावधीत या कालव्याच्या भरावा, पुल, मोऱ्याची कामे रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून पूर्ण झाली. तर १९९१ मध्ये पहिल्यांदा पाणी सोडण्यात आले होते. कालव्याचा भराव, जीर्ण बांधकामे, सुरक्षितता यासाठी गेल्या तीस वर्षात कोणत्याही प्रकारची कामे झालेली नाहीत. दहा वर्षांपूर्वी अस्तरीकरनाचा बागुलबुवा उभा केला.

मात्र त्याचा गळती रोखण्यासाठी उपयोग झाला नाही. पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब शेटे यांच्यासह अधिकाऱ्यांनी घटना स्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांनतर आवर्तन बंद करण्याचा निर्णय झाला. पुलावरील गळती रोखण्यासाठी भराव मधोमध खोदुन त्यात काळ्या मातीचा भराव करण्याचे काम दुपारी तीन वाजता पोकलेन च्या साहाय्याने सुरु करण्यात आले. ते दोन दिवसात पूर्ण करून सोमवारी चार ‘मे’ ला  आवर्तन पुन्हा सुरू करण्यात येईल असे शेटे यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.