बस्ती (उत्तर प्रदेश) – समाजवादी पार्टीच्या अपहरण झालेल्या बस्ती जिल्हा प्रमुखाची आज पोलिसांनी सुटका केली. उत्तर प्रदेश पोलिसांनी समाजवादी पार्टीचेच आमदार महेंद्रनाथ यादव यांच्या घरावर छापा घालून पक्षाचे जिल्हाध्यक्ष रामकुमार आणि त्यांच्या कुटुंबीयांची सुटका केली.
उत्तर प्रदेशच्या विधानपरिषदेचे सदस्य असलेल्या महेंद्र नाथ यादव यांनी बहादुरपूर जिल्ह्याचे अध्यक्ष रामकुमार, त्यांची पत्नी आणि चार वर्षांच्या मुलाला गेल्या चार महिन्यांपासून आपल्या घरातच कोंडून ठेवले असल्याचे उघड झाले आहे.
रामकुमार आणि त्यांचे कुटुंबीय बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांनी कलवारी पोलीस ठाण्यात महेंद्र नाथ यादव यांच्याविरोधात प्रकरण दाखल केले होते. महेंद्रनाथ यादव यांनीच रामकुमार आणि त्यांच्या कुटुंबीयांचे अपहरण केल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल झाली होती. त्यानंतर केलेल्या तपासादरम्यान रामकुमार हे महेंद्रनाथ यादव यांच्याच घरात असल्याचे आढळून आले होते.
याबाबत मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा घालून रामकुमार आणि त्यांच्या कुटुंबीयांची सुटका केली. मात्र दारात पोलिसांना बघताच महेंद्र नाथ यादव यांनी घराचे दरवाजे बंद करून घेतले. मात्र थोडा वेळ संयम दाखवून पोलिसांनी बळाचा वापर केला आणि अपहरण झालेल्या सर्वांची सुटका केली.
रामकुमार यांनी आपल्या मेव्हण्याला फोनवरून आपण महेंद्रनाथ यादव यांच्या घरी असल्याचे सांगितले. त्यामुळे रामकुमार यांचा ठावठिकाणा उघड होऊ शकला होता. या संदर्भात पुढील तपास सुरू असून रामकुमार यांना पोलिसांचे संरक्षण देण्यात आले आहे, असे बस्तीचे पोलीस अधिक्षक आशीष श्रीवास्तव यांनी सांगितले.
महेंद्रनाथ यादव हे सपाचे जिल्हाध्यक्ष होते. मात्र त्यांना विधानसभेची उमेदवारी देण्यात आली आणि ते निवडूनही आले आहे. दरम्यान रामकुमार हे भारतीय जनता पार्टी सोडून समाजवादी पार्टीत आले होते.