UP : लोकसभा निवडणुकीपूर्वी मायावतींना मोठा धक्का; दोन मोठे नेते BJPमध्ये दाखल..

लखनऊ : 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने इतर पक्ष फोडण्यास सुरुवात केली आहे. याअंतर्गत सपा, बसपा आणि काँग्रेसच्या नेत्यांचे पक्षात प्रवेश होत आहे.
बसपाच्या तिकिटावर आग्रा येथील दक्षिण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवलेले रवी भारद्वाज आणि खेरागडमधून बसपकडून निवडणूक लढवलेले गंगाधर कुशवाह यांनी लखनऊमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ही बातमी समजताच बसपामध्ये खळबळ उडाली आहे.
भाजपने 2024 च्या तयारीला वेग दिला आहे. अशा स्थितीत प्रत्येक पक्षात धुसफूस सुरू आहे. मोठ्यांपासून ते लहानापर्यंतच्या नेत्यांचा भाजपमध्ये समावेश केला जात आहे.
प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र चौधरी, उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक आणि केशव मौर्य यांनी सोमवारी लखनऊ येथील भाजपच्या प्रदेश कार्यालयात बसपाचे रवी भारद्वाज आणि गंगाधर कुशवाह यांना पक्षात प्रवेश दिला.
2022 मध्ये रवी भारद्वाज यांनी दक्षिण विधानसभा मतदारसंघातून बसपाच्या तिकिटावर भाजपचे कॅबिनेट मंत्री योगेंद्र उपाध्याय यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती.
त्याचवेळी खेरागडमधून निवडणूक लढवलेले गंगाधर कुशवाह यांनीही हत्तीवरून खाली उतरून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. गंगाधर कुशवाह हे दीर्घकाळापासून बसपामध्ये सक्रिय होते. ते जिल्हाध्यक्षही राहिले आहेत.
दरम्यान, आगामी काळात आणखी अनेक नेतेही भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.






