UP: काॅंग्रेसला धक्का, ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षबदलाचे सत्र सुरू; 2 महिला आमदारांचा भाजपात प्रवेश

लखनौ – उत्तरप्रदेशच्या रायबरेली जिल्ह्यातील आमदार आदिती सिंह यांनी बुधवारी कॉंग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला. लोकसभेत रायबरेली मतदारसंघाचे प्रतिनिधित्व कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी करत असल्याने त्या घडामोडीला मोठे राजकीय महत्व आहे.

मागील काही काळापासून आदिती यांनी बंडाचे निशाण फडकावले होते. त्या सातत्याने कॉंग्रेसलाच लक्ष्य करत होत्या. त्यामुळे त्यांचा पक्षबदल निश्‍चित मानला जात होता. अपेक्षेनुसार त्या भाजपमध्ये दाखल झाल्या. त्यांच्या समवेत बसपच्या आमदार वंदना सिंह यांनी भाजपचे सदस्यत्व स्वीकारले. त्या आझमगढमधील आमदार आहेत. त्या लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व सपचे अध्यक्ष अखिलेश यादव करतात. उत्तरप्रदेशातील विधानसभा निवडणूक अवघ्या तीन महिन्यांवर येऊन ठेपली आहे.

अशात दोन महिला आमदारांना प्रवेश देऊन सत्तारूढ भाजपने विरोधकांना राजकीय हादरा दिल्याचे मानले जात आहे. आठवडाभरापूर्वीच सपच्या चार विधान परिषद सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर उत्तरप्रदेशात पक्षबदलाचे सत्र सुरू झाल्याचे चित्र आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.