लखनऊ – कोरोना रूग्णवाढीचे प्रमाण हे कमी होत चालले असून रूग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. कोरोनाबाबतची लोकांच्या मनातील भितीही कमी झाली आहे. एवढ्या दिवस लाॅकडाऊनमध्ये असलेले लोक आता सर्व अनलाॅक करण्याची तसेच चित्रपट गृह, नाट्यगृह, मल्टिप्लेक्स सुरू करण्याची मागणी करत आहेत. उत्तर प्रदेश सरकारने याबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे.
उत्तर प्रदेश मध्ये 15 ऑक्टोंबरपासून 50 टक्के प्रेक्षक क्षमतेने चित्रपटगृह, नाट्यगृह, मल्टिप्लेक्स सुरू करण्यात येणार आहे. याबाबत
उत्तर प्रदेश सरकारने काही मार्गदर्शक सुचना जाहीर केल्या आहेत.
उत्तर प्रदेश सरकारने मंगळवारी जाहीर केलेल्या मार्गदर्शक सुचनांमध्ये कंटेन्मेंट झोन मध्ये येणारे चित्रपटगृह, नाट्यगृह, मल्टिप्लेक्स सुरू करण्यास माण्यता देण्यात आलेली नाही.
चित्रपटगृह, नाट्यगृह, मल्टिप्लेक्समध्ये येणाऱ्या प्रेक्षकांनी मास्क घालणे, एकमेकांमध्ये 6 फुटाचे अंतर राखणे, सार्वजनिक ठिकाणी न थूंकणे, सॅनिटायझरचा वापर करणे, खोकताना किंवा शिंकताना रूमालाचा वापर करणे हे नियम प्रेक्षकांसाठी बंधनकारक असणार आहेत. तसेच प्रत्येकाला आरोग्य सेतु अॅप वापरण्याबाबत सल्ला देण्यात येणार आहे.