नवी दिल्ली – उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसने गुरूवारी 41 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. त्यामध्ये 16 महिलांचा समावेश आहे. उत्तरप्रदेश निवडणुकीसाठी कॉंग्रेसने महिला कार्ड पुढे केले आहे. किमान 40 टक्के महिलांना उमेदवारी देण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. त्याचे प्रतिबिंब कॉंग्रेसने आतापर्यंत जाहीर केलेल्या उमेदवारांच्या दोन्ही याद्यांमध्ये उमटले.
पहिल्या यादीत 125 उमेदवारांचा समावेश होता. त्या यादीत 50 महिलांना स्थान मिळाले. आता दुसरी यादी जाहीर करताना कॉंग्रेसने 40 टक्के महिला उमेदवारांचे प्रमाण कायम ठेवले. अधिकाधिक महिलांबरोबरच जनतेच्या हक्कांसाठी लढणाऱ्यांना, विविध आंदोलनांमध्ये सहभागी झालेल्यांना उमेदवारी देण्याची रणनीती कॉंग्रेसने आखली आहे.
त्या पक्षाने दोन याद्यांमध्ये मिळून 166 उमेदवार जाहीर केले. त्यामध्ये 66 महिलांचा समावेश आहे. उत्तरप्रदेशात विधानसभेच्या एकूण 403 जागा आहेत. त्या राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी 7 टप्प्यांत मतदान होणार आहे. उत्तरप्रदेशात प्रामुख्याने भाजप आणि सपमध्ये लढत अपेक्षित आहे. मात्र, वेगळी रणनीती आखून कॉंग्रेसने निवडणुकीची रंगत वाढवली आहे.