कोथरूड भाजपमध्ये नाराजीनाट्य?

राज्यात “फिर एक बार भाजप सरकार’चा नारा देणाऱ्या भाजपला राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री असलेले चंद्रकांत पाटील यांच्यासाठी सर्वाधिक सुरक्षित मतदारसंघ शोधण्याची वेळ आली आहे का, अशा चर्चा चंद्रकांतदादांच्या उमेदवारीनंतर कोथरूडमध्ये रंगल्या आहेत. पक्षाने पाटील यांच्यासाठी कोथरूड विधानसभा मतदारसंघ निश्‍चित केला असला, तरी पाटील यांच्या उमेदवारीने मतदारसंघात अस्वस्थता पसरली आहे. पक्षाच्या या निर्णयामुळे पुणे भाजपमध्ये एका दगडात अनेक पक्षी मारले जाणार असल्याने अनेकांना आपल्या राजकीय इच्छा-आकांक्षांना तिलांजली द्यावी लागणार आहे. त्यातच शिवसेनेनेही पाटील यांच्या उमेदवारीला अप्रत्यक्षपणे आक्षेप घेत थेट आव्हान दिल्याने पाटील यांच्यासाठी शहर भाजपला मोठी कसरत करावी लागणार असल्याची चर्चा सोमवारी दिवसभर शहरात होती.

एका उमेदवारीत अनेकांना धक्‍का
मागील विधानसभा निवडणुकीत शहरात भाजपने ऐतिहासिक विजय मिळवित आठही मतदारसंघात कमळ फुलवले. त्यात शहर संघटनेचा मोठा वाटा होता. प्रामुख्याने या विजयानंतर पुणे भाजपची सर्व सूत्रे विद्यमान खासदार गिरीश बापट यांच्या हातात होती. तर, या विजयाने बापट यांच्याकडेच शहराचे नेतृत्व आले. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत बापटांच्या गळ्यात खासदारकीची माळ गेल्याने पुण्याचे पालकमंत्री पद तसेच अप्रत्यक्षपणे शहराचे नेतृत्व कोणाकडे जाणार, याबाबत चर्चांना उधाण असतानाच पुण्यातील भाजप आमदारांना संधी न देता थेट राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना पालकमंत्री पद देण्यात आले. मात्र, विधानसभा निवडणुका असल्याने ते तात्पुरते दिल्याचे सांगत वेळ मारून नेत शहर भाजपमधील नाराजी टाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.

मात्र, आता थेट पाटील यांना पुण्यातूनच निवडून आणत त्यांच्या खांद्यावर पुण्याची जबाबदारी देण्याची भाजपची साधी सरळ खेळी आहे. पाटील यांच्यासाठी हा मतदरसंघ सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत असले तरी, या निमित्ताने पुणे भाजपवर पकड ठेवण्यासाठी बाहेरून नेता आणण्यात आल्याची चर्चा आहे. साहजिकच पाटील यांचे नाव निश्‍चित झाल्यास आणि ते निवडून आल्यास पुन्हा त्यांच्याकडेच पुण्याचे पालकमंत्रीपद जाणार आहे. त्यामुळे पुढे पाटील यांच्या हातातच पुण्याची सूत्रे राहणार असल्याचे स्पष्ट चित्र आहे. तसे झाले, तर सलग तिसऱ्यांदा पुण्यातून आमदार म्हणून निवडून जाण्याची शक्‍यता असलेल्या माधुरी मिसाळ यांनाही पालकमंत्रीपदाची संधी मिळणार नाही. तसेच भाजपमध्ये आलेल्या पिंपरी-चिंचवडमधील पालकमंत्री पदाचे स्वप्न पाहणाऱ्यांचा स्वप्नभंग होणार आहे.

“दूरचा नको घरचा पाहिजे, आमचा आमदार कोथरूडचा पाहिजे’
कोथरूडमधून भाजपने चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिल्याची चर्चा आहे. मात्र, पाटील यांच्या या निवडीला भाजपमधूनच विरोध होत असून “दूरचा नको घरचा पाहिजे; आमचा आमदार कोथरूडचा पाहिजे’ – आम्ही कोथरूडकर असे पोस्टर मतदारसंघात झळकविण्यात आले आहेत. महर्षी कर्वेंच्या पुतळ्याच्या रेलिंगवरच हे पोस्टर लावण्यात आहे. हे पोस्टर भाजप कार्यकर्त्यांनी लावले, की विरोधकांनी? याबाबत संभ्रम आहे. तर, हा विरोधकांचा खोडसाळपणा असल्याचा दावा भाजपचे शहरातील नेते करत असले तरी हे पोस्टर काढण्याची तसदी शहर भाजपने घेतलेली नाही. त्यामुळे पाटील यांच्या उमेदवारीबाबत काहीच आलबेल नसल्याचे समोर आले आहे.

ब्राह्मण महासंघाचाही विरोध
पाटील यांच्या निवडीला अखिल भारतीय ब्राह्मण महासंघानेही विरोध केला असून समाजाला विरोध करणाऱ्या उमेदवाराच्या विरोधात गरज पडल्यास ब्राह्मण महासंघाकडून उमेदवार उभा करण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष आनंद दवे यांनी दिला आहे. दवे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, “ब्राह्मण समाज नेहमीच भाजपच्या बरोबर राहिला आहे. मात्र, जातीय आरक्षणाचे राजकारण करून खुल्या वर्गातील लोकांना सर्वच संधी नाकारणाऱ्या पक्षाबरोबर जायचे की नाही, याचा विचार करावा लागेल. त्यामुळे आमच्या समाजाला गृहीत धरणाऱ्यांबाबत विचार करावा लागेल.’

अंधारात ठेवल्याने नाराजी
पाटील यांची उमेदवारी भाजपकडून अतिशय गुप्त ठेवण्यात आली होती. त्याची चाहुल विद्यमान आमदार अथवा या मतदारसंघातील इच्छुकांनाही लागू देण्यात आली नाही. थेट त्यांचे नाव सोमवारीच चर्चेत आणण्यात आले. या मतदारसंघातून विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी आणि नगरसेवक मुरलीधर मोहोळ यांच्यात चुरस होती. तर या दोन्ही उमेदवारांत कथित स्पर्धा असल्याने भाजपचे तारणहार गिरीश महाजन यांनी पुण्यातील एका नगरसेवकाची शिफारस केली होती. मात्र, वाद टाळण्यासाठी चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्याचे सुरू असले, तरी पक्षातील अनेकांना अंधारात ठेवल्याने नाराजी असल्याचे बोलले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.