ज्यांचे लसीकरण झालेले नाही त्यांना ‘डेल्टा प्लस’ विषाणूचा अधिक धोका – WHO प्रमुख घेब्रेयेसुस

जिनिव्हा – करोनाच्या डेल्ट प्लस या जातीच्या विषाणूचा जगातील किमान 85 देशांमध्ये प्रादुर्भाव निर्माण झाला आहे. या विषाणूमध्ये अत्यंत कमी वेळात अधिक जणांना बाधित करण्याची क्षमता आहे.

हा विषाणू ज्यांचे लसीकरण झालेले नाही त्यांच्यामध्ये अत्यंत वेगाने पसरतो आहे ही बाब अधिक चिंता निर्माण करणारी आहे असे जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख तेड्रोस घेब्रेयेसुस यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, या विषयावर जगाची जी चिंता आहे तीच चिंता आम्हालाही आहे. हा विषाणू प्रथम भारतात आढळून आला आहे असेही त्यांनी आज पत्रकारांशी बोलताना नमूद केले.

ते म्हणाले की, करोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर काही देशांनी आपल्या देशातील लोकांच्या वावरावरील निर्बंध काढून टाकले आहेत. त्यामुळे या नव्या विषाणूंच्या प्रादुर्भावाचा मार्गच प्रशस्त होताना दिसत आहे. या विषाणूचा प्रसार आपण योग्य त्या उपाययोजना आणि निर्बंधांमधून रोखू शकतो. त्याकडे आता आपल्या सर्वांनाच लक्ष केंद्रित करावे लागणार आहे असे त्यांनी म्हटले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेतील कोविडच्या तांत्रिक गटाच्या प्रमुख डॉ. मारिया व्हॅन केरखोव्ह यांनी म्हटले आहे की, या विषाणूचे वैशिष्ट्य असे की तो ज्या कोणत्या देशात शिरकाव करतो तेथे तो प्रचंड वेगाने पसरतो. याच्या प्रादुर्भावाच्या ट्रॅकवर आम्ही आहोत, असेही त्यांनी सांगितले. युरोपात करोना कमी होत आहे त्यामुळे तेथे मोठे इन्व्हेंट होताना दिसत आहेत तीच अधिक चिंतेची बाब आहे, असे त्या म्हणाल्या.

त्या म्हणाल्या की, जगातील कोणत्याच देशाची लसीकरणाची प्रक्रिया अजून शंभर टक्‍के पूर्ण झालेली नाही. अनेक देशांमध्ये लसीकरणाची टक्‍केवारी चांगली असली तरी अनेकांना अजून लसींचा दुसरा डोस मिळालेला नाही. अशा लोकांमध्ये या विषाणूंच्या प्रादुर्भावाची शक्‍यता अधिक असते, असेही त्यांनी म्हटले आहे. कोविड लसीकरण या नवीन व्हेरियंटला निश्‍चित पायबंद घालेल. निदानपक्षी लसीकरण झालेल्या काही व्यक्‍तींना या विषाणूची बाधा जरी झाली तरी त्यातून त्याच्या जीवावर बेतण्याची शक्‍यता मात्र खूपच कमी आहे.

तथापि, या प्रादुर्भावाच्या संबंधात आपल्याला दोन महिन्यांनी विचार करून चालणार नाही तर आता या क्षणीच या धोक्‍याचा आपल्याला विचार करावा लागणार आहे. त्यामुळे विविध देशांतील नेते जितक्‍या लवकर यावर उपाययोजना सुरू करतील त्या कृत्यावर याचा चांगला किंवा वाईट परिणाम अवलंबून असणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.