मुंबई – भाजप नेत्या चित्रा वाघ आणि अभिनेत्री, माॅडेल उर्फी जावेद वाद प्रकरण शांत होण्याचे नाव घेत नाहीए. चित्रा वाघ यांनी आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवला असून जोपर्यंत उर्फी जावेदवर कारवाई होत नाही, ती जोपर्यंत पूर्ण कपडे घालत नाही, तोपर्यंत मी शांत बसणार नसल्याचे वाघ यांनी म्हंटले आहे.
चित्रा वाघ परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी आपला उर्फीविरोधातील लढा सुरूच राहणार असल्याचे सांगितले आहे. त्यांनी म्हटले की, एका विकृतीविरोधात मी बोलले तर माझ्या विरोधात सगळे एकत्र झाले. माझ्या मुलांचे फोटोदेखील व्हायरल केले. कुणाला काय करायचे ते करू द्या. मात्र, मी माझ्या भूमिकेवर ठाम असून तिला अटक होऊन तिच्यावर कारवाई होऊन जोपर्यंत ती पूर्ण कपडे घालत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नसल्याचे चित्रा वाघ यांनी म्हटले.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांचा वाद सुरु आहे. सोशल मीडियावर हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. अनेकांनी चित्रा वाघ यांच्या भूमिकेचे समर्थन केले आहे तर काहींनी उर्फी जावेदला पाठिंबा दर्शवलाय. हे प्रकरण पोलीस ठाणे आणि राज्य महिला आयोगापर्यंत पोहोचले आहे. एकमेकांविरोधात तक्रारीही दाखल करण्यात आल्या आहेत. आता हे प्रकरण कधी शांत होते हे पाहणे महत्वाचे आहे.
उर्फीने पोलिसांकडे नोंदवला जबाब
काही दिवसांपूर्वी चित्रा वाघ यांनी मुंबई पोलिसांकडे उर्फी जावेदविरोधात तक्रार केली होती. सार्वजनिक ठिकाणी अंग प्रदर्शन केल्याप्रकरणी ही तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर आज आंबोली पोलीस ठाण्यात जबाब नोंदवण्यासाठी उर्फी जावेदला पोलिसांनी नोटीस बजावली होती. आज आंबोली पोलीस ठाण्यात हजर राहून उर्फीने जबाब नोंदवताना आपली बाजू मांडली आहे.
मी भारताची नागरीक आहे. मला माझ्या आवडीचे कपडे परिधान करण्याचा, वागण्याचा आणि बोलण्याचा अधिकार आहे. हा अधिकार मला राज्यघटनेने दिला आहे. मी जे कपडे परिधान करते, ते माझ्या आवडीने परिधान करते. माझ्या असे कपडे घालण्यावर माझ्या घरच्यांचा अजिबात आक्षेप नाही. मी परिधान करत असलेले कपडे हे माझ्या कामाच्या अनुषंगाने परिधान करते. त्यावरून माझे फोटोशूट होत असतात. माझ्या कामाच्या व्यस्ततेमुळे कधी कधी कपडे बदलण्याचा वेळ नसतो. त्याचवेळी कॅमेरे घेऊन आलेले लोक माझे फोटो काढतात. हेच फोटो व्हायरल होतात. हे व्हायरल होणारे फोटो मी कसे थांबवू शकते, असा जबाब उर्फी जावेदने मुंबई पोलीसांकडे नोंदवला आहे.