लंडन: करोना विषाणू इन्फ्लूएंजा सारखा हंगामी आजार नाही. या संसगांवर लस तयार होत नाही तोवर याचा प्रकोप सुरूच राहणार असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेचे विशेष प्रतिनिधी डेव्हिड नाबरो यांनी दिला आहे. करोना विषाणूची जगभरात 18,62,244 जणांना बाधा झाली आहे. तर 1 लाख 14 हजार 980 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 4 लाख 31 हजार 666 जणांना संसर्गापासून मुक्तता मिळाली आहे. करोना विषाणू मानवाचा दीर्घकाळापर्यंत पाठलाग करत राहणार असल्याचे वाटते. केवळ लसच यापासून आम्हाला वाचवू शकते असे नाबरो यांनी म्हटले आहे.
ट्रम्प यांच्या मित्राचा मृत्यू
न्यूयॉर्कचे रियल इस्टेट व्यावसायिक आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे मित्र स्टेनली चेरा यांचा करोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. ते 70 वर्षांचे होते. फेडरल इलेक्शन कमिशननुसार 2016 ते 2019 या कालावधीत स्टेनली यांनी ट्रम्प व्हिक्ट्री ऑर्गनायझेशनला सुमारे 4 कोटी रुपयांची देणगी दिली होती. न्यूयॉर्कमध्ये आतापर्यंत 9 हजार 385 जणांचा मृत्यू झाला आहे. तर शहरातील रुग्णांची संख्या 1 लाखापेक्षा अधिक झाली आहे. न्यूयॉर्कनंतर न्यूजर्सी प्रांतात कोरोनाचे सर्वात मोठे संकट निर्माण झाले असून तेथे आतापर्यंत 2 हजार 350 जणांचा मृत्यू झाला आहे.
गृहमंत्र्यांचा राजीनामा नाकारला
तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप तैयप एर्दोगान यांनी गृहमंत्री सुलेमान सोयलू यांचा राजीनामा स्वीकारण्यास नकार दिला आहे. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी सोयलू यांनी देशाच्या 31 प्रांतांमध्ये 48 तासांची संचारबंदी लागू केली होती. या निर्णयामुळे हजारोंच्या संख्येत लोकांनी दुकानांमध्ये धाव घेतली होती. लोकांनी सोशल डिस्टेंसिंगचे पालन केले नव्हते तसेच मास्कही परिधान केला नव्हता. या कारणामुळे गृहमंत्र्यांवर टीकेची झोड उठली होती. यातून सोयलू यांनी रविवारी रात्री अध्यक्षांना राजीनाम्याचे पत्र सोपविले होते. तुर्कस्तानात आतापर्यंत 1200 जणांचा मृत्यू झाला असून 56 हजार 956 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.