शेवटच्या श्‍वासापर्यंत धनकवडीकरांचा मी ऋणी राहील – भीमराव तापकीर

पुणे – खडकवासला विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार भीमराव तापकीर यांनी रविवारी (दि. 13) धनकवडी परिसरात पदयात्रा काढली. मतदारांनी दिलेली साथ, विश्‍वास तसेच आतापर्यंत केलेल्या विकासकामाच्या जोरावर मी आमदार झालो. यापुढेही अशीच साथ मिळेल असा विश्‍वास व्यक्‍त करत, शेवटच्या श्‍वासापर्यंत धनकवडीकरांचा मी ऋणी राहील, असे भावनिक मत तापकीर यांनी या पदयात्रेदरम्यान व्यक्‍त केले.

धनकवडी येथील श्री जानुबाई मंदिरात दर्शन घेऊन पदयात्रेला सुरवात झाली. केशव कॉम्प्लेक्‍स, तानाजीनगर, मोहनगर, पी. के. नगर, संभाजीनगर, सावरकर चौक, तळजाई पठार, रामचंद्रनगर, धनकवडी गावठाण, नित्यानंद सोसायटी, चैतन्यनगर, अक्षयनगर या मार्गे पदयात्रा पार पडली. राजमुद्रा सोसायटी येथे पदयात्रेची सांगता झाली. यावेळी महिला आणि तरुणांचा मोठा सहभाग दिसून आला.

ठिकठिकाणी तापकीर यांना औक्षण करण्यात आले. पदयात्रेत नगरसेविका वर्षा तापकीर यांच्यासह भारतीय जनता पक्ष, शिवसेना, आरपीआय (आठवले), रासप, शिवसंग्राम, रयतक्रांती महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.