कालवे पूर्ण होईपर्यंत नीरा-देवघरचे पाणी फलटणला मिळावे

जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांची मागणी

फलटण – नीरा-देवघरच्या पाण्यामुळे फलटण तालुक्‍याच्या 36 गावांमधील बागायती क्षेत्रात वाढ झाली आहे. मात्र 12 जून रोजी शासनाने दिलेल्या निर्देशानुसार नीरा-देवघरचे पाणी बंद झाल्याने याच वाढलेल्या बागायती क्षेत्रातील ऊस व अन्य पिकांचे मोठे नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे नीरा-देवघरचे कालवे पूर्ण होईपर्यंत सदरचे पाणी या भागाला पूर्वीप्रमाणे मिळावे, अशी मागणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केली आहे.

शासनाने नीरा-देवघरचे पाणी या प्रकल्पाच्या लाभक्षेत्राबाहेर न देता सदरचे पाणी लाभक्षेत्रात देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी नीरा उजवा कालव्यावरुन उपसा सिंचनाद्वारे आणि पिण्याच्या पाणी योजनासाठी हे पाणी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रासाठीच उपलब्ध करुन देण्याचा निर्णयामुळे सध्या फलटण तालुक्‍यातील 36 गावांना मिळणारे हे पाणी बंद झाले तर तेथील पीके पाण्याअभावी जळून जाण्याचा आणि तेथे दुष्काळसदृष्य परिस्थिती उद्‌भवण्याचा धोका असल्याने सदरचे पाणी फलटण, माळशिरस, खंडाळा तालुक्‍याला सध्याप्रमाणे नीरा-देवघरचे कालवे होईपर्यंत मिळाले पाहिजेत अशी आग्रही मागणी संजीवराजे यांनी केली आहे.

शासनाने नीरा-देवघरचे कालव्या ऐवजी बंदिस्त पाईपलाईनद्वारे लाभक्षेत्राला पाणी देण्याचा निर्णय घेतल्यास या प्रकल्पाचे पाणी वापर सुरु होईल त्यावेळी बंदिस्त पाईपलाईनमुळे बाष्पीभवन आणि लाईन लॉसेसद्वारे वाया जाणारे पाणी वाचणार असल्याने भविष्यात सदरचे पाणी खंडाळा, फलटण, माळशिरसच्या बागायती पट्ट्यातील कमी होणारे पाणी याच क्षेत्रासाठी उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणीही संजीवराजे यांनी केली आहे. तसेच नीरा-देवघर पाण्याचे वाटप भोर, खंडाळा, फलटण, माळशिरस या तालुक्‍यापुरतेच असल्याचे नमुद करीत तशी तरतूद मूळ प्रकल्प अहवालात आहे. त्यामध्ये बदल केल्यास सदर क्षेत्रास योग्य प्रमाणात पाणी मिळू शकणार नाही ही बाब संजीवराजे यांनी निदर्शनास आणून दिली आहे.

सासवड, जेजुरी वगैरे भागातील पिण्याच्या पाणी पुरवठा योजना आणि औद्योगिक वसाहतीसाठी आज वीर जलाशयातून घेतले जाणारे पाणी आगामी काळात गुंजवणी धरणातून घेतले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतानाचा जलसंपदा राज्यमंत्री तथा पालक मंत्री ना. शिवतारे यांनी गुंजवणीच्या पाण्यासंबंधी शासनाकडे केलेली मागणी वाचनात आल्यानंतर संजीवराजे यांनी आता गुंजवणीचे पाणी सासवड, जेजुरी पिण्याच्या पाणी योजना व औद्यागिक क्षेत्रासाठी वापरावे अशी विनंती केली आहे.

शासनाच्या दि. 12 जूनच्या निर्णयामुळे फलटण तालुक्‍यातील 36 गावांना 2 टीएमसी पाणी कमी मिळणार असून त्यामुळे सुमारे 20 हजार एकर क्षेत्र कोरडे राहण्याचा धोका लक्षात घेवून नीरा-देवघर प्रकल्पाचे कालवे पूर्ण होईपर्यंतच्या कालावधीसाठी या भागाला मिळणारे सध्याचे पाणी कायम ठेवावे अशी आग्रही मागणी संजीवराजे यांनी केली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)