शिवसेना गटनेत्यांची आयुक्तांकडे मागणी
पुणे – शहरातील रामटेकडी येथील सुमारे 40 हजार टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी ठेकेदारांना विनानिविदा 9 कोटी खर्चाचे काम देण्याबाबत प्रशासनाने ठेवलेला प्रस्ताव स्थायी समितीने मंजूर केला. मात्र, महापालिकेची सध्याची आर्थिक स्थिती पाहता चुकीच्या पद्धतीने हे काम पुढे आणण्यात आले असून त्याची निविदा तत्काळ रद्द करावी, अशी मागणी शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी केली आहे.
अंदाजपत्रकातील खर्चाबाबत प्राधान्यक्रम ठरवून 30 ते 40 टक्के कामे करण्याबाबतचा निर्णय स्थायी समितीमार्फत प्रशासनाने घेतला हे निश्चित या विषयाशी विसंगत आहे. एकीकडे निधी नाही म्हणून कामे थांबवायची व दुसरीकडे अशी चुकीची कामे करून उधळपट्टी करायची का, असा प्रश्न सुतार यांनी उपस्थित केला आहे.
पुणे मनपाच्या सर्वसाधारण सभेने कचरा प्रक्रियेचे काम करण्यासाठी 530 रुपये दर निश्चित केला असताना, प्रशासनाने परस्पर 900 रुपये दर निश्चित करून सर्वसाधारण सभेच्या ठरावाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत.
प्रत्यक्षात जमा होणारा कचरा व प्रशासनाने नवीन ठेवलेल्या विषयपत्रातील जमा होणारा कचरा यामध्ये प्रचंड तफावत आहे. त्यातच, मागील चार वर्षांमध्ये मनपाने कोणाकोणाला कोणत्या ठिकाणी कचरा प्रक्रिया करण्याचे काम दिले होते प्रथमतः जाहीर करावे, अशी मागणीही सुतार यांनी केली आहे.