पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरात सलग चौथ्या दिवशी विजांच्या कडकडाटात शहराला जोरदार अवकाळी पावसाने झोडपले. शहराच्या विविध भागांत पावसाने गारांसह हजेरी लावली. तर वादळी पावसाने शहराच्या विविध भागांत 25 हून अधिक झाडे उन्मळून पडली आहेत. दुपारनंतर अग्निशामक विभागाची यामुळे मोठी धावपळ झाली. शहरात गेल्या चार दिवसांपासून ठिकठिकाणी गारांसह पाऊस कोसळत आहे. बुधवारी रावेत, देहूरोड परिसरात सायंकाळी तासभर गारांसह अवकाळी पाऊस कोसळला. तर, गुरुवारी (दि. 1) सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. सायंकाळी शहराच्या विविध भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. दापोडी परिसरात गारांचा पाऊस झाला.
यंदा वातावरणात मोठा बदल झाला असून मार्च व एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळीनंतर गेल्या चार दिवसांपासून रोज जोरदार अवकाळी पाऊस पडत आहे. हवामानशास्त्र विभागाने मोसमी पाऊस दोन दिवसांत अरबी समुद्रात दाखल होईल, असा अंदाज वर्तविला असून महाराष्ट्रात मोसमी पावसाचे आगमन होण्यास किमान दहा दिवस प्रतीक्षा करावी, लागणार असल्याचे सांगितले आहे. मात्र, शहरात सध्या वादळी, वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत आहे. गुरुवारी सायंकाळी जोरदार पडलेल्या अवकाळी पावसामुळे वातावरणात काही काळ गारवा निर्माण झाला. परिणामी उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला.