तळेगाव-चाकण मार्गावर असुरक्षित ऊस वाहतूक

अपघातांची भीती : पोलिसांपुढे अपघात रोखण्याचे आव्हान

इंदोरी – सध्या ऊस गाळप हंगाम सुरू आहे. तळेगाव-चाकण मार्गावर इंदोरी ते तळेगाव दरम्यान असुरक्षित ऊस वाहतूक सुरू आहे. ट्रक, ट्रॅक्‍टरमध्ये क्षमतेपेक्षा अधिक उसाची वाहतूक केली जात आहे. त्यामुळे चालकांमध्ये अपघातांची भीती दिसून येत आहे.

ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्‍टर, ट्रक जात असल्यास प्रमाणाहून अधिक भरलेला ऊस कधीही ढासळणे, तोल गेल्याने संपूर्ण ट्रॅक्‍टर उलटणे, नादुरुस्त ट्रॅक्‍टर, ट्रॉली रस्त्यातच उभी ठेवण्याचे प्रकार सध्या वाढले आहेत. वाहतूक नियम धाब्यावर बसवून चालकांकडून बेपर्वाईने ऊस वाहतूक केली जात आहे. याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे.

पुणे जिल्ह्यातील श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्यासह लगतच्या साखर कारखान्यांसाठी कार्यक्षेत्रातील मावळ, मुळशी, हवेली, खेड, आंबेगाव, जुन्नर आदी तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या उसाचा पुरवठा केला जातो. मात्र ऊस पुरवठा होत असताना योग्य ती काळजी घेतली जात नाही, हे वास्तव आहे. परिणामी अपघातांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

वाहन चालकांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन होणार नाही, याचीही काळजी घेतली पाहिजे. कारखान्याकडे ऊसानंतर वाहतूक ट्रॅक्‍टर तसेच ट्रक चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

आपल्यामुळे इतरांना अपघाताचा सामना करावा लागू नये याची खबरदारी घ्यावी. ऊस वाहतूक क्षमतेबाबत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे अधिकार आहेत. दोषींवर प्रसंगी दंडात्मक कारवाई करणे गरजेचे आहे. वाहतूक नियम संदर्भात ऊस वाहतुकीसाठी साखर कारखान्यांना काही मार्गदर्शक सूचना ठरलेल्या आहेत. त्याची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.

मोटार वाहन कायद्यानुसार ट्रॅक्‍टर ते ट्रॉलीची लांबी 18 मीटर ठेवणे बंधनकारक असताना दोन ट्रॉली जोडण्याचा धोका पत्करला जात आहे. ट्रॅक्‍टर व ट्रॉलीत जादा ऊस भरला गेल्याने एक्‍सल, पाटे तुटणे, चाक निखळण्याचे प्रकार होतात, यावर नियंत्रण घालणे आवश्‍यक आहे.

वाहतूक नियमांचा बोजवारा…
ऊस बाहेर पडू नये यासाठी ट्रॉलीला बाजूने जोडावयाच्या लोखंडी खांबाचा अभाव दिसतो. तात्पुरते लाकडी खांब लावून ऊस रचणे धोकादायक आहे. हादरे बसून ढिल्ला झालेला ऊस रस्त्यावर कोसळू शकतो. ट्रॉलीला इंडिकेटर नसणे, रिफलेक्‍ट, रेडियम नसणे यामुळे अपघातास निमंत्रणच आहे. यामध्ये सुधारणा होणे अपेक्षित आहे. ट्रॉलीतून ऊस वाहतूक होत असताना अनेक जण ट्रॉलीतील ऊस खेचण्याचा प्रयत्न करतात. हे जीवावर बेतू शकते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.