– तरुणाच्या धाडसामुळे मोठी जिवितहानी टळली
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बसचा विनाचालक पीएमपी’चा थरार नागरिकांनी मंगळवारी सकाळच्या सुमारास अनुभवला. या बसचा ब्रेक निकामी झाल्याने विनावाहक बस उतारावरुन सुमारे 100 मीटर अंतरावर गेली. सुदैवाने या अपघातात कोणीही गंभीर जखमी झाले नाही. मात्र, दोन रिक्षांचे नुकसान झाले असून दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत.
सकाळी साडे सातची वेळ असल्याने कात्रज बस स्थानकाजवळ विद्यार्थी, भाजीवाले, नोकरदार यांची मोठी वर्दळ होती. कात्रज पीएमपी बस स्वारगेटच्या दिशेने तोंड करून उतारावर लावण्यात आली होती. या बसचा चालक पिराजी दिवटे हा वाहकाला बोलवण्यासाठी गाडीला उभे खाली उतरला. मात्र अचानक बसने वेग धरला. सुदैवाने तेव्हा कोणीही प्रवासी बसमध्ये बसलेले नव्हते.
पुढे जाऊन ही बस एका रिक्षावर आदळली. उपस्थित असलेल्या नागरिकांनी आरडाओरडा केल्याने जवळच असलेल्या दिगंबर कोराळे (रा.अय्यपा मंदीर जवळ,कात्रज) या टॅक्सी ड्रायव्हरने आपल्या जीवाची पर्वा न करता धावत्या बसमध्ये प्रवेश केला. मात्र, तोपर्यंत पीएमपी बस मुंबई बायपास चौकापर्यंत पोहचली होती. पुढे ती सिग्नलला उभ्या असलेल्या वाहनांना आदळणार; तो पर्यत या युवकाने ब्रेक दाबून गाडी थांबवली.