टोकियो : – जपानमध्ये अखेर आगामी टोकियो ऑलिम्पिकच्या काउंटडाऊन सोहळ्याला प्रारंभ झाला. करोनामुळे एक वर्ष पुढे ढकलण्यात आलेल्या या स्पर्धेला पुढील वर्षी 23 जुलैपासून प्रारंभ होत आहे.
या स्पर्धेची अनुकूल वातावरण निर्मिती व्हावी यासाठी संपूर्ण देशात विविध ठिकाणी काउंटडाऊन वॉच बसविण्यात आली आहेत व शुक्रवारपासून खऱ्या अर्थाने देशात 365 दिवसांनी जगातील सर्वात मानाची स्पर्धा सुरू होणार असल्याचा संदेश जपान सरकार व जपान ऑलिम्पिक संघटनेने
दिला आहे.
मूळ वेळापत्रकानुसार ही स्पर्धा यंदा 24 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीत होणार होती. मात्र, जगभरात करोनाचा धोका वाढल्याने ही स्पर्धा एक वर्ष पुढे ढकलण्यात आली. आता नव्या वेळापत्रकानुसार ही स्पर्धा पुढील वर्षी 23 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत होत आहे.
यंदा ज्या प्रायोजकांनी स्पर्धेशी करार केला होता त्यांनी निधी रोखल्याने स्पर्धेच्या तयारीवर परिणामही झाला होता. मात्र, जपान सरकारने व संघटनेने आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेशी सातत्याने संवाद साधत स्पर्धेसाठी अनुकूल वातावरण तयार करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले असून स्पर्धेचे काउंटडाऊन वॉच बसविण्यात आल्याने नागरिकांनी पुन्हा एकदा स्पर्धेच्या आयोजनाला पाठिंबा देत सकारात्मक वातावरण निर्माण होत असल्याची ग्वाहीदेखील दिली.
ही स्पर्धा जेव्हा करोनाच्या धोक्यामुळे पुढे ढकलण्यात आली तेव्हा जपानच्या नागरिकांनी स्पर्धेला विरोध सुरू केला होता. अब्जावधी डॉलर्सचा खर्च मुळातच केला गेला होता आणि स्पर्धा पुढे गेल्याने सर्व सुविधा तशाच सज्ज राहाव्यात यासाठी पुन्हा एकदा प्रचंड खर्च येणार असल्याने देशातील करदात्यांवरच हा बोजा पडणार होता. त्यामुळे स्पर्धेला विरोधही वाढत होता. मात्र, राखेतून पुन्हा भरारी घेण्याचा इतिहास असलेला उगवत्या सूर्याचा हा देश पुन्हा एकवटला व स्पर्धेच्या काउंटडाऊन वॉच सोहळ्याला पाठिंबा देत पुन्हा उभारी धरत असल्याचे चित्र स्पष्ट झाले.
प्रायोजकही सरसावले…
पहिल्यांदा पुढे गेलेल्या स्पर्धेतून अंग काढून घेण्याचा इशारा देणारे प्रायोजकही आता स्पर्धेला सहकार्य करण्यासाठी पुढे आले आहेत. त्यामुळे सर्व प्रायोजकांनी पुढील वर्षी होत असलेल्या या स्पर्धेसाठी यंदा जो करार केला होता तो कायम राहणार असल्याचा विश्वासही या सोहळ्यात दिला. त्यामुळे सरकार व संघटना यांच्या समोर निर्माण झालेला खर्चाचा पेचही सुटला आहे.