पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आठही प्रभाग अध्यक्षांची बिनविरोध निवड

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग अध्यक्षपदाच्या निवडणुकीची औपचारिकता शुक्रवारी (दि.9) पार पडली. शर्मिला बाबर, सुरेश भोईर, राजेंद्र लांडगे, सागर आंगोळकर, विकास डोळस, बाबा त्रिभुवन, हर्षल ढोरे, कुंदन गायकवाड यांची बिनविरोध प्रभागअध्यक्षपदी वर्णी लागली.

भाजपकडून “अ’ प्रभाग अध्यक्षपदासाठी शर्मिला बाबर यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. “ब’ प्रभाग सुरेश भोईर, “क’ प्रभाग राजेंद्र लांडगे, “ड’ प्रभाग सागर आंगोळकर, “ई’ प्रभाग विकास डोळस, “ग’ प्रभाग अध्यक्षपदासाठी बाबा त्रिभुवन यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. “ह’ प्रभाग हर्षल ढोरे आणि “फ’ प्रभागाच्या अध्यक्षपदासाठी कुंदन गायकवाड यांची निवड करण्यात आली.

महापालिकेच्या आठही प्रभाग समित्यांच्या सभापती पदासाठी शुक्रवारी निवडणूक होती. या निवडीसाठी महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामधील मधुकर पवळे सभागृहात प्रभागांच्या विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. पुणे विभागीय आयुक्तांच्या प्रतिनिधी म्हणून अपंग कल्याण आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांनी सभेचे पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले.

प्रत्येक प्रभाग समिती सभापती पदाच्या निवडीवेळी सभा शाखा सचिव म्हणून त्या त्या प्रभागाच्या प्रशासन अधिकाऱ्यांनी काम पाहिले. यामध्ये अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह प्रभागाचे प्रशासन अधिकारी अनुक्रमे सुचिता पानसरे, सोनम देशमुख, दिलीप आढारी, कैलास गावडे, अवधूत तावडे, वामन नेमाणे, श्रीनिवास दांगट आणि श्रीकांत कोळप यांचा समावेश होता. निवडीवेळी सभागृहात अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांच्यासह नगरसचिव उल्हास जगताप, क्षेत्रीय अधिकारी चंद्रकांत इंदलकर, प्रशांत जोशी, अण्णा बोदडे, कैलास गावडे, बाळासाहेब खांडेकर, मनोज लोणकर, स्मिता झगडे आणि संदीप खोत उपस्थित होते.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी प्रभाग अध्यक्षपदासाठी अर्ज भरले नाहीत. त्यामुळे बिनविरोध निवडणूक होण्याचा मार्ग मोकळा झाला होता. महापौर माई ढोरे व पक्षनेते नामदेव ढाके यांच्या हस्ते नवनियुक्त अध्यक्षांचा सन्मान करण्यात आला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.