अनधिकृत होर्डिंग्ज मानगुटीवर!

वडगाव मावळ – पुणे-मुंबई महामार्ग, द्रूतगती मार्गासह मावळ तालुक्‍यातील राज्य मार्गावर अनधिकृत जाहिरात होर्डिंग्जचे पेव फुटले आहे. रस्त्यांच्या दुतर्फा उभारलेल्या जाहिरात होर्डिंग्जमुळे अपघाताचा धोका वाढला आहे. अनधिकृत थाटलेल्या होर्डिंग्ज वाहनचालक, प्रवाशांच्या मानगुटीवर बसल्याचे वास्तव चित्र आहे. अपघाताला निमंत्रण देणारी धोकादायक होर्डिंग्ज हटविण्याची मागणी समोर आली आहे.

मावळ तालुक्‍यातील चाकण-उर्से राज्यमार्ग, पुणे-मुंबई महामार्ग व द्रुतगती मार्ग या रस्त्यांच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावर जाहिरातींची होर्डिंग्ज दिसतात. अनेक होर्डिंग्ज आणि फ्लेक्‍सबाजी वाहनचालकांचे लक्ष वेधते. बेकायदा होर्डिंग्जवर झळकणाऱ्या जाहिरातींमुळे अपघाताचा धोका वाढला आहे. बहुतेक ठिकाणी होर्डिंग्ज आणि फ्लेक्‍स हे महामार्गाच्या हद्दीतच झळकतात.

सध्या अवकाळी आणि वादळी पावसाचे दिवस आहेत. होर्डिंग्ज अनेक ठिकाणी धोकादायक स्थितीत आहेत. सोसाट्याचा वाऱ्यामुळे होडिंग्ज कोसळण्याची भीती आहे. या महामार्गावरून 24 तास औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक तसेच अन्य वाहतूक सुरूच असते. बेकायदा होर्डिंग्ज आणि टोलेजंग फ्लेक्‍स कोसळून अपघाताची शक्‍यता वाढली आहे. याकडे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला जाग कधी येणार असा सवाल वाहन चालकांकडून उपस्थित केला जात आहे.

पुणे-मुंबई महामार्गावर सोमाटणे फाटा व द्रूतगतीवर वरसोली येथे टोल वसूल केली जाते. बऱ्याचदा अपघातग्रस्त वाहने हटविण्यासाठी “आयआरबी’कडे वेळ नसतो. रस्त्यावरील अपघातग्रस्त वाहनांमुळे वाहतूक कोंडीत भर पडते. होर्डिंग्ज उभारताना नजीकच्या झाडांची कत्तल केली जाते. धक्‍कादायक म्हणजे होर्डिंग्ज अथवा फ्लेक्‍स उभारण्यासाठी धोकादायक रेल्वे आणि महावितरणच्या उच्चदाब वाहिनीची जागाही अपुरी पडत असल्याचे वास्तव चित्र दिसून येत आहे.
पुणे-मुंबई महामार्गाच्या दुतर्फा मुख्य चौक, दर्शनीभागी व्यावसायिकांनी उभारलेल्या धोकादायक होर्डिंग्ज आणि फ्लेक्‍स तात्काळ हटविले पाहिजेत. या मार्गाच्या हद्दीत वृक्षारोपण करण्याची मागणी मावळ तालुक्‍यातील सामाजिक कार्यकर्ते सोमा भेगडे, अतुल वायकर, मयूर ढोरे, दिलीप डोळस, मयूर काळोखे, आशिष खांडगे, दिनेश पगडे, प्रतीक पिंजण, हरीश दानवे यांनी केली आहे.

व्यावसायिकांच्या स्पर्धेला गती…

पुणे-मुंबई महामार्ग आणि एक्‍सप्रेस वे व अन्य महामार्गाच्या हद्दीत होर्डिंग्ज, फ्लेक्‍स उभारून अनेक व्यावसायिक भाडे मिळवण्याची स्पर्धाच सुरू आहे. महामार्गालगत मिळेल तिथे जागा शोधून होर्डिंग्ज थाटत व्यवसाय सुरू केल्याचे ओरड आहे. अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. त्यात वादळी वारा, विजांचा कडकडाट सुरू आहे. त्यामुळे धोका अधिक वाढत असल्याचे दिसते. या धोकादायक होर्डिंग्जमुळे महामार्गावरून जीव मुठीत घेत प्रवास करावा लागतो. महामार्गावर किती होर्डिंग असावेत, अशी कोणतीही नियमावली नसल्याने दुतर्फा बेकायदा होल्डिंग्जचा विळखा पडला आहे. वाढत्या जाहिरातबाजीमुळेही महामार्ग विद्रूप झाला असून, त्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे असल्याचे जाणकारांचे मत नोंदविले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.