सातारा: तालुक्यातील एका गावात चौदा वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. संजय चव्हाण, प्रशांत चव्हाण, किरण चव्हाण अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे असून रात्री उशिरापर्यंत त्यांना अटक करण्यात आलेली नव्हती. दरम्यान, संबंधित अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार करण्याची घटना २0१९ मध्ये घडलेली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, संबंधित पीडित चौदा वर्षीय मुलगा सातारा तालुक्यातील एक गावातील असून तो आठवीत शिक्षण घेत आहे. संजय तानाजी चव्हाण याने २0१९ मध्ये अल्पवयीन मुलाला गावातील शिवारात तर प्रशांत सुभाष चव्हाण याने गावातच एकाच्या घरात तर किरण पांडूरंग चव्हाण याने गावातील शिवारात नेवून अल्पवयीन मुलावर जबरदस्तीने अनैसर्गिक अत्याचार केले. दरम्यान, याप्रकरणी मुलाच्या आईने सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर संजय चव्हाण, प्रशांत चव्हाण आणि किरण चव्हाण या तिघावर अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघानाही रात्री उशिरापर्यंत अटक करण्यात आलेली नव्हती.
दरम्यान, घटनास्थळी सहायक पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी भेट दिली असून पोलिसांना तपासबाबत आवश्यक त्या सूचना केल्या आहेत. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक देव करत आहेत.