पुणे – उन्नत रिंगरोडलगत 500 मीटरपर्यंत 4 “एफएसआय’

‘एचसीएमटीआर’ रस्ता : शहर सुधारणा समितीची मान्यता

पुणे – शहरातील बहुचर्चित “एचसीएमटीआर’ अर्थात “हाय कपॅसिटी मास ट्रान्झिट रुट'(उन्नत वर्तुळाकार) रस्त्यालगतच्या दोन्ही बाजूचा 500 मीटरपर्यंतचा परिसर “एचसीएमटीआर टीओडी’ क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात येणार आहे. त्यात या रिंगरोडच्या दोन्ही बाजूला 500 मीटरपर्यंत जास्तीत जास्त 4 “एफएसआय’ (चटई क्षेत्र निर्देशांक) देण्यात येणार आहे.

वाढीव “एफएसआय’साठी प्रीमियम दराची आकारणी करण्यात येणार असून हा निधी या रस्त्याच्या उभारणीसाठी वापरण्यात येणार आहे. “टीओडी’ अर्थात ट्रान्सिस्ट ओरिएंटेड डेव्हलपमेंट क्षेत्रासाठी राज्य सरकारच्या मान्यतेसाठी शहर सुधारणामार्फत सर्वसाधारण सभेची मंजुरी घेणे आवश्‍यक आहे. त्या संबंधीच्या प्रस्तावाला शहर सुधारणा समितीने शुक्रवारी मान्यता दिली आहे.

पालिकेच्या सन 1987च्या विकास आराखड्यात “एचसीएमटीआर’ दर्शविण्यात आला आहे. या रस्त्यावर प्रति तास 50 किलोमीटर वेग ठेवण्यासाठी मार्गात बदल केले असून त्याला मान्यता मिळाली आहे. केंद्र सरकारच्या नॅशनल ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट पॉलिसीवर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी मास रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम जसे मेट्रोरेल, बस रॅपिड ट्रान्झिट (बीआरटी) सिस्टीम यांचा वापर वाढविण्यासाठी त्यांचे बाजूचे नागरी क्षेत्र आर्थिक मोबदल्यात जास्तीचे चटईक्षेत्र (एफएसआय) देऊन विकसित करण्याची तरतूद आहे. “एचसीएमटीआर’ प्रकल्पामध्ये 2 मार्गिका “बीआटी’साठी राखीव आहे. त्यामुळे या प्रकल्पाला “टीओडी’ची तरतूद लागू होणार आहे. रस्त्याच्या तांत्रिक आराखड्यास सर्वसाधारण सभेने मान्यता दिली आहे. या रस्त्यासाठी में. कॅपिटल फॉर्च्युन प्रा.लि. यांची आर्थिक सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

नॅशनल ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट पॉलिसीनुसार ट्रान्झिट स्टेशनचे 500 ते 800 मीटरचे रेडिअसमध्ये किंवा दोन ट्रान्झिट स्टेशनमधील अंतर 1 कि.मी.पेक्षा कमी असल्यास ट्रान्झिट कॅरिडोअरचे मार्गिकेबरोबर 500 मीटर पर्यंत टीओडी झोन निर्देशित करण्याची तरतूद आहे. टीओडी झोन निर्दशित करण्याचे अधिकार आयुक्तांना आहेत. महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियमनुसार, मेट्रो लाईनलगतचा 500 मीटरचा परिसर मेट्रो प्रभावित क्षेत्र म्हणून दर्शविण्यात आलेला आहे. त्याच धर्तीवर “एचसीएमटीआर’मधील बीआरटी मार्गिकेलगतच दोन्ही बाजूस 500 मीटरचा परिसर “एचसीएमटीआर टीओडी’ प्रभावित क्षेत्र म्हणून जाहीर करणे योग्य होणार आहे, अशी माहिती शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष सुशिल मेंगडे यांनी दिली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)