पुणे – शहरात करोनाबाधितांची संख्या कमी होताच, महापालिकेची विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवरील कारवाईही जानेवारीमध्ये थंडावली आहे. दरम्यान मे 2020 पासून आतापर्यंत पालिकेच्या आरोग्य निरीक्षकांकडून शहरात 6,520 जणांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून 32 लाख 55 हजार 600 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर, जानेवारीमध्ये तीन आठवड्यात अवघ्या 192 जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 96 हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
महापालिका प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, शहरात मार्चमध्ये करोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता, त्यानंतर देशव्यापी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यानंतर शहरात लॉकडाऊन शिथिल होताना पालिकेकडून मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले. त्यानंतर पालिकेकडून शहरात विनामास्क फिरणाऱ्यांकडून प्रत्येकी 500 रुपयांचा दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्यानंतर शहरात पालिकेच्या आरोग्य निरीक्षकांच्या माध्यमातून कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्यात मे महिन्यात अवघ्या 2 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर कारवाईचा जोर वाढविण्यात आला. त्यानंतर 21 जानेवारी अखेरपर्यंत पालिकेने सुमारे 6 हजार 520 जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 32 लाख 55 हजार 600 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
महिना …………. कारवाई………………वसूल दंड
मे …………………2…………………..1 हजार रुपये
जून…………………189………………90 हजार 100 रुपये
जुलै…………………417………………2 लाख 8 हजार 500 रुपये
ऑगस्ट…………….14…………………..7 हजार रुपये
सप्टेंबर……………..3438……………17 लाख 90 हजार रुपये
ऑक़्टोबर……………1267…………..6 लाख 33 हजार 500 रुपये
नोव्हेंबर……………..585…………….2 लाख 92 हजार 500 रुपये
डिसेंबर……………..416………………2 लाख 8 हजार रुपये
21 जानेवारी अखेर…….192……………96 हजार रुपये