बीजिंग – गेल्या 61 वर्षांच्या कालावधीमध्ये प्रथमच लोकसंख्या घटली असल्याने आगामी काळातील मनुष्यबळाच्या टंचाईचा विचार करून चीन सरकारने आता लोकसंख्या वाढवण्यासाठी नियोजन सुरू केले आहे. त्यासाठी विविध उपायांची आणि योजनांची घोषणा करण्यात येत आहे. याच योजनेचा एक भाग म्हणून आता अविवाहित जोडप्यांनाही मुलाला जन्म देण्याची परवानगी देण्यात आली आहे.
जगातील सर्वात जास्त लोकसंख्येचा देश म्हणून एकेकाळी गणती होत असणाऱ्या चीनने जाणीवपूर्वक प्रयत्न करून आपल्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवले होते. त्यासाठी वन चाइल्ड पॉलिसीचा अंमल करून जास्त मुलांना जन्म देणाऱ्या नागरिकांना कोणत्याही सुविधा दिल्या जात नव्हत्या. त्यानंतरच्या कालावधीमध्ये ही पॉलिसी बदलून टू चाइल्ड पॉलिसी करण्यात आली.
आता ह्या पॉलिसीमध्येही बदल केला असून मुलांच्या संख्येवर कोणतेही नियंत्रण ठेवण्यात आलेले नाही. पूर्वी फक्त पहिल्या जन्मलेल्या मुलाला सर्व सुविधा मिळत असत. दोन किंवा तीन क्रमांकाच्या मुलाला कोणत्याही सरकारी सुविधा दिल्या जात नसत. आता मात्र सरकारने या सर्व नियमांमध्ये बदल केला आहे. चीनची अर्थव्यवस्था संपूर्णपणे मनुष्यबळावरच अवलंबून आहे.
गेल्या काही वर्षांच्या कालावधीमध्ये चीनने संपूर्णपणे या मनुष्यबळाचा वापर करूनच आपली प्रगती साधली आहे; पण आगामी कालावधीमध्ये या मनुष्यबळाचे प्रमाण कमी झाले तर अर्थव्यवस्थेला हानी पोहोचू शकते ही गोष्ट लक्षात घेऊन चीन सरकारने आत्तापासूनच नियोजन सुरू केले आहे. चीनमध्ये मुलाचा जन्म होताच त्याची नोंदणी करणे सक्तीचे आहे. यापूर्वीच्या धोरणाप्रमाणे फक्त पहिल्या मुलाचीच नोंदणी केली जात असे, आता मात्र विवाहित जोडप्यांना त्यांच्या सर्व मुलांची नोंदणी करणे शक्य होणार आहे. तसेच अविवाहित जोडप्यांना सुद्धा त्यांच्या संबंधातून झालेल्या मुलांची नोंदणी करणे शक्य होणार आहे.
सरकार या धोरणामुळे अनैतिक वागण्याला प्रोत्साहन देत नसून चीनमध्ये जर सिंगल मदर्स असतील तर त्यांना योग्य संरक्षण मिळावे याच हेतूने हा नियम करण्यात आल्याचा खुलासा सरकारकडून करण्यात आला आहे. चीनमधील सिचुआन राज्याने सर्वात प्रथम या योजनेला अंमलात आणले आहे. या राज्याची लोकसंख्या आज आठ कोटी पेक्षा जास्त आहे तरीसुद्धा त्यांनी आगामी कालावधीमध्ये ही लोकसंख्या वाढावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. अशाच प्रकारचे धोरण इतरही सहा राज्यांनी अमलात आणले आहे.