जिल्हाधिकारी राम : “मिशन बिगीन अगेन’बाबत अधिसूचना
पुणे – शहरासह जिल्ह्यात करोनाचा संसर्ग अजूनही वाढत आहे. त्यामुळे शासन आदेशानुसार 31 ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आले आहे. दरम्यान, जिल्ह्यातील पुढील महिन्याभरात टप्पे निहाय लॉकडाऊन निर्बंध कमी करण्यासाठी “मिशन बिगीन अगेन’ बाबत अधिसूचना जाहीर केली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.
करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू आहे. हे आदेश 31 ऑगस्टपर्यंत लागू राहतील. दरम्यान, पुणे शहर, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि छावणी परिषद क्षेत्राच्या आदेशातील अटी व शर्तीच्या अधिन राहून महानगरपालिका हद्दीतील सर्व उपक्रम व कृतींना परवानगी देण्यात आली आहे.
तर, ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत हद्दीत मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन यांच्याकडील अधिसूचनेत परवानगी दिलेले सर्व उपक्रम अटी व शर्तीच्या अधिन राहून परवानगी राहील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.