जिल्हाधिकाऱ्यांचे 30 सप्टेंबरपर्यंत सुधारीत आदेश जारी
सातारा (प्रतिनिधी)- शासनाच्या आज दि. 31 ऑगस्ट रोजीच्या आदेशानुसार राज्यातील करोनाच्या अनुषंगाने दिलेल्या सुधारीत सूचना व पुन्हा सुरु’ मोहिमेंतर्गत साताऱ्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी नवीन आदेश जारी केले आहेत. त्यानुसार सातारा जिल्हयात 1 सप्टेंबरपासून ते 30 सप्टेंबर पर्यंत पुढीलप्रमाणे आदेश निर्गमित केले आहेत.
जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सातारा जिल्हा कार्यक्षेत्रात पुढील बाबींना मनाई करणेत येत आहेत.
• सर्व शाळा, महाविदयालये, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, कोचिंग इंस्ट्युटयुट या बंद राहतील. तथापि, ऑनलाईन/ अंतराचे शिक्षणास परवानगी राहील.
• चित्रपट गृहे, जलतरण तलाव, करमणूक उदयाने, थिएटर (मॉल्स व मार्केट कॉम्प्लेक्समधील ), बार, सभागृह, असेंबली हॉल यासारख्या इतर सर्व जागा बंद राहतील.
• रेल्वे व विमान प्रवासी वाहतूक काही ठराविक आदेशाने मान्यता दिली असल्यास किंवा आदर्श कार्य प्रणाली नुसार चालू राहील.
• सर्व सामाजिक, राजकिय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व इतर मेळावे तसेच मोठया संख्येने लोक जमा होणारे कार्यक्रम, परिषदा बंद राहतील.
• सार्वजनिक ठिकाणी दारू, पान, तंबाखू इत्यादी सेवन करणेस मनाई करणेत येत आहे.
• सर्व धार्मिक स्थळे व प्रार्थनास्थळे सर्वसामान्यासांठी बंद राहतील. तथापि, सर्व धार्मिक स्थळे / सार्वजनिक प्रार्थनास्थळे ही सामान्य व्यक्तींकरिता बंद राहतील. तथापि, तेथील नित्य नियमाचे धार्मिक कार्यक्रम संबंधित धर्मगुरु, पुजारी यांना करता येतील.
• वय वर्ष 65 वरील व्यक्ती, व्याधीग्रस्त नागरिक, गर्भवती महिला, 10 वर्षा खालील मुले यांनी अत्यावश्यक सेवा व वैदयकीय सेवा वगळता इतर कारणास्तव बाहेर पडण्यास प्रतिबंध राहील.
जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सातारा जिल्हा कार्यक्षेत्रातील खालील बाबींना परवानगी राहील.
• दिनांक 2 सप्टेंबर 2020 पासून सर्व हॉटेल व लॉजिंग यांना चालू ठेवणेस परवानगी देत आहे. तथापि, शासनाने निर्धारित केलेली आदर्श कार्य प्रणाली (SOP) चे पालन करणे बंधनकारक राहील.
• दिनांक 2 सप्टेंबर 2020 पासून व्यक्ती व वस्तू यांना आंतरजिल्हा हालचालींवर कोणतेही बंधन नाही. अशा हालचालींसाठी वाहने आणि त्यातून प्रवास करणाऱ्या व्यक्तींसाठी स्वतंत्र परवानगी /मान्यता/ई-परवान्याची आवश्यकता नाही.
• दिनांक 2 सप्टेंबर 2020 पासून खाजगी बस, मिनी बस व इतर यंत्रणेव्दारे प्रवासी वाहतूकीसाठी परवानगी राहील. तथापि त्याकरीता परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांनी निर्देशित केलेल्या आदर्श कार्य प्रणाली (SOP) चे पालन करणे बंधनकारक राहील.
• बाहय शारिरीक क्रियाकलाप (Outdoor Physical Activities) करणेस कोणतेही बंधन असणार नाही.
• सर्व सार्वजनिक व खाजगी वाहतूकीतील लोकांच्या हालचाली करण्यास पुढीलप्रमाणे परवानगी राहील. टॅक्सी / कॅब/ ॲग्रीगेटर – फक्त अत्यावश्यक 1+ 3, रिक्षा – फक्त अत्यावश्यक 1+ 2, चार चाकी- फक्त अत्यावश्यक 1+3, दोन चाकी – 1 + 1 मास्क व हेल्मेटसह. प्रवास करताना मास्कचा वापर करणे बंधनकारक असेल.
• सर्व मार्केट/ दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 7 या वेळेमध्ये चालु रहातील. तथापि, मेडीकल/औषधाची दुकाने पुर्णवेळ चालू ठेवणेस परवानगी राहील. जर पाच पेक्षा जास्त व्यक्ती दुकानात असल्यास अथवा सामाजिक अंतराचे पालन न केलेस तात्काळ बंद करावीत.
• सातारा जिल्हयातील प्रतिबंधित क्षेत्रामध्ये कोणतेही कार्यक्रम आयोजीत करणेस मनाई आहे. तथापि, प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर क्षेत्रात खुले लॉन, विना वातानुकूलित मंगल कार्यालय/हॉल/सभागृह, घर व घराच्या परिसरात 20 लोकांच्या (संपुर्ण कार्यक्रमासाठी) मर्यादेत लग्नाशी संबंधित मेळावे/ समारंभाचे आयोजन करणेकामी संबंधित तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांची परवानगी घेणे बंधनकारक राहील. तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेश दि.26/06/2020 मधील अटी व शर्तींचे पालन करणे संबंधितांवर बंधनकारक राहील.
• अंत्यविधी यासारख्या कार्यक्रमास 20 पर्यंत (संपुर्ण कार्यक्रमासाठी) व्यक्तींना सामाजिक अंतर ठेऊन कार्यक्रम करणेस परवानगी राहील.
• वृत्तपत्र छपाई आणि वाटप करणेस परवानगी देणेत येत आहे. (घरपोच वितरणासह)
• केश कर्तनालय, स्पा, सलून, ब्युटी पार्लर हे शासनाने दिलेल्या अटी व शर्ती तसेच जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सातारा यांचेकडील आदेश दि.27 जून 2020 मधील अटी व शर्तीन्वये चालू ठेवणेस परवानगी देणेत येत आहे.
• सातारा जिल्हयातील सर्व सेतू केंद्र, महा-ई-सेवा केंद्र व आधारकेंद्र जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सातारा यांचेकडील आदेश दि. 11 जून 2020 मधील अटी व शर्तीन्वये चालू ठेवणेस परवानगी राहील.
• सातारा जिल्हयातील इंधन पंप, औदयोगिक आस्थापना व सर्व वैदयकीय आस्थापना पुर्णवेळ चालू ठेवणेस परवानगी आहे.