पणन संचालक, बाजार समिती प्रशासकांचा अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मेळाव्यात सूर
पुणे – शेतकऱ्यांना घाऊक माल विक्रीसाठी दुसरा सक्षम पर्याय जोपर्यंत निर्माण होत नाही. तोपर्यंत बाजार समित्या बंद करणे योग्य ठरणार नाही. पर्यायाशिवाय बाजार समित्या बंद केल्यास गोंधळाची परिस्थिती निर्माण होईल. तुलनात्मक भाव ठरवण्याचा अधिकार शेतकऱ्यांना राहणार नाही, असा सूर पणन संचालक सुनील पवार आणि पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बी.जे.देशमुख यांनी व्यक्त केला.
बाजार समितीच्या वतीने अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उपअभियंता प्रमोद तुपे यांनी पवार, देशमुख यांची मुलाखत घेतली. त्यावेळी ते दोघे बोलत होते. सुनील यांच्या पत्नी नीलिमा, देशमुख यांच्या पत्नी कामिनी, बाजार समितीचे उपसचिव सतीश कोंडे, “फॅम’चे वरिष्ठ उपाध्यक्ष अध्यक्ष राजेश शहा, दी जॉगरी मर्चंट्स अध्यक्ष राजेंद्र गुगळे, श्री छत्रपती शिवाजी आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ, फुलबाजार आडते असोसिएशनचे अध्यक्ष अरुण वीर, भाजीपाला विभाग प्रमुख दत्तात्रय कळमकर, फळ विभाग प्रमुख बाबासाहेब बिबवे यांच्यासह अन्य पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.
पवार म्हणाले, “सावकारीला आळा घालण्यासाठी बाजार समित्या सुरू करण्यात आल्या आहेत. अचूक वजनमाप, वेळेवर पैसे आणि स्पर्धात्मक मालाची विक्री तेथे होत असते. त्यामुळे पर्यायाशिवाय बाजार बंद करणे योग्य नाही.’ तर देशमुख म्हणाले, “भावातील चढ-उतार हा मोठा प्रश्न आहे. माल जास्त आल्यास भाव मिळत नाही. कमी माल आल्यावर भाव जास्त मिळतो. त्यामुळे शेतकऱ्यांना कष्ट करून उत्पादन घेऊन न्याय मिळत नाही. यासाठी बाजार समिती कायद्यातील त्रुटी दूर केल्या पाहिजेत. उपाययोजना केली पाहिजे. चांगले नेटवर्क तयार केले पाहिजे. शेतकऱ्यांना भाव मिळत नसल्याने बाजार समिती, बाजार घटक शेतकऱ्यांना लुटते, असा समज सर्वसामान्य नागरिकांमध्ये आहे.
सध्या एकूण उत्पन्नाच्या केवळ एक-तृतीयांश मालच बाजारात येत आहे. अधिक माल येण्यासाठी सुविधा दिल्या पाहिजेत. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन माल उचलला पाहिजे. आधुनिक शीतगृहे असली पाहिजेत. जेथे शेतकऱ्यांचा चार-पाच दिवस माल ठेवता आला पाहिजे. शेतकऱ्यांना कधी, कुठे मालाची गरज आहे, हे कळविले पाहिजे. जेणेकरून त्याच्या उत्पादित मालाला जास्त भाव मिळेल. अन्यथा सूत गिरणी, साखर कारखान्यांप्रमाणे ही व्यवस्था खासगी व्यवस्थेसमोर कूचकामी ठरेल.