दोन महिन्यांत सव्वा लाख व्हिजीटर्स…
पुणे(प्रतिनिधी) – संचारबंदी काळात शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना घरबसल्या अभ्यास करता यावा, यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सुरू केलेल्या “ई-कंटेन्ट’ पोर्टलला सव्वालाख विद्यार्थ्यांनी भेट दिली असून, आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेतला आहे.
कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या पुढाकारातून संचारबंदी कालावधीत पुणे विद्यापीठाने “ई-कंटेन्ट’ ही सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली. या दोन महिन्यांत सर्व विद्याशाखांचे मिळून 10 हजारांपेक्षा जास्त पीपीटी, पीडीएफ फाईल्ससह प्राध्यापकांनी तयार केलेले व्हिडिओ विद्यापीठाच्या संकेतस्थवर उपलब्ध होत आहेत. त्यामुळे गावी गेलेल्या विद्यार्थ्यांना पुस्तकाविना घरी बसून अभ्यास करणे शक्य झाले.
विद्यापीठाने “ई-कंटेन्ट’ पोर्टल सुरू केले. त्यासाठी 25 जणांची खास टीम तयार करून त्यांना प्रशिक्षण दिले. गेल्या दोन महिन्यांत पुणे विद्यापीठातील व संलग्न महाविद्यालयांमधील 1 हजारांहून अधिक प्राध्यापकांनी व्हिडिओ, पीपीटी, पीडीएफ नोट्स लेक्चर्स, प्रोजेक्ट, प्रश्नसंच असे साहित्य पोर्टलसाठी उपलब्ध करून दिले आहे. यामध्ये कला, वाणिज्य, व्यवस्थापन, अभियांत्रिकी, विज्ञान, स्पर्धा परीक्षा यांचे साहित्य असून, विज्ञान व तंत्रज्ञान या विद्याशाखा साहित्य सर्वाधिक उपलब्ध झाले आहे. हजारो विद्यार्थ्यांनी फाईल, व्हिडिओ डाउनलोड करून घेतले आहेत.
“संचारबंदी काळात कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या संकल्पनेतून सुरू केलेल्या ई-कंटेन्ट पोर्टल विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरत आहे. पहिल्याच प्रयत्नात त्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी झाल्याने ही कल्पना प्रत्यक्षात यशस्वी ठरली. अधिकाधिक प्राध्यापकांनी नावीन्यपूर्ण कंटेन्ट निर्मिती करणे आवश्यक आहे. या पोर्टलद्वारे विद्यार्थ्यांना अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न राहील.
– डॉ. संजीव सोनवणे, अधिष्ठाता, आंतरविद्याशाखीय अभ्यास शाखा
आंतर-विद्याशाखीय अभ्यास शाखेचे अधिष्ठाता डॉ. संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू आहे. जयकर ग्रंथालयाचे सहायक ग्रंथपाल डॉ. संजय देसले हे या प्रकल्पाचे समन्वयक आहेत. देसले यांनीही ई-कंटेन्ट पोर्टलवर विद्यार्थ्यांना चांगला प्रतिसाद मिळत असून, त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होत असल्याचे ते म्हणाले.