स्पर्धा परीक्षांच्या प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी शिफारस करण्याचे विद्यापीठाला आवाहन
पुणे – महाराष्ट्र शासनातील विविध पदांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध स्पर्धा परीक्षा आयोजित केल्या जातात. या प्रश्नपत्रिका काढण्यासाठी त्या त्या विषयातील तज्ज्ञ प्राध्यापकांची आवश्यकता असते. त्या पार्श्वभूमीवर आयोगाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील तज्ज्ञ प्राध्यापकांची माहिती मागविली आहे. स्पर्धा परीक्षांसाठी विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयातील तज्ज्ञांची सहकार्य घेण्यात येणार आहे.
शासकीय अधिकारी, लिपिकपासून सर्व संवर्गातील पदेही आयोगामार्फत होणाऱ्या परीक्षेद्वारे भरती केली जाते. या परीक्षांसाठी प्रश्नांचा दर्जा व उच्चतम काठिण्यपातळी योग्य असणे अपेक्षित आहे. या परीक्षांचे पेपर काढण्यासाठी आयोगास तज्ज्ञ प्राध्यापक हवे आहेत. त्यानुसार प्रश्न तयार करण्यासाठी तज्ज्ञ व चिकित्सक परीक्षकांचाही दर्जा असणे आवश्यक आहे. त्यासाठी आयोगाला उपलब्ध असलेली विषयनिहाय तज्ज्ञसूची करावयाची आहे.
त्या पार्श्वभूमीवर पुणे विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयात किमान दहा वर्षांचा अध्यापन व संशोधनाचा अनुभव असणाऱ्या विषय तज्ज्ञांची म्हणजेच कार्यरत असणाऱ्या अनुभवी सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापकांची नावांची आयोगास नितांत आवश्यकता आहे, असे आयोगाने विद्यापीठाला दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. आयोगामार्फत तज्ज्ञांना आमंत्रित केल्यानंतर त्यांनी केलेल्या कामाचे मानधन देण्यात येते. तसेच महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार प्रवासखर्च व दैनंदिन भत्ता इत्यादी सुविधा दिले जाणार आहे.
पात्र प्राध्यापकांनी दि. 12 फेब्रुवारीपर्यंत सर्व माहिती प्रशासन शिक्षक कक्षाकडे सादर करावेत, असेही विद्यापीठाने नमूद केले आहे. ही यादी आयोगाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वांनी वेळेत माहिती सादर करावीत, असेही विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.