पुणे- नवसंकल्पना क्षेत्रात काही करू इच्छिणाऱ्यांसाठी आता पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात “डिप्लोमा इन इनोव्हेशन अँड न्यू व्हेंचर’ हा पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे.
अहमदाबादच्या आंत्रप्रुनरशीप डेव्हलपमेंट ऑफ इंडिया या संस्थेच्या सहकार्याने हा अभ्यासक्रम राबवला जाणार आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विज्ञान, तंत्रज्ञान, संगणकशास्त्र या विषयातील पदवी ही पात्रता आहे. 21 आठवडे मुदतीचा हा अभ्यासक्रम आहे. व्यवस्थापन नवसंकल्पना, ग्राहककेंद्रित नवसंकल्पना आणि उत्पादन व्यवस्थापन, कायदेशीर बाबी, बौद्धिक संपदा व्यवस्थापन आणि तंत्रज्ञान, नव्या उद्योगाचे नियोजन आणि व्यवस्थापन हे विषय या अभ्यासक्रमाद्वारे शिकवले जातील.
अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने आतापर्यंत सुरू केलेले अभ्यासक्रम पदव्युत्तर पदवी स्तरावरचे आहेत. त्यामुळे हा कमी कालावधीचा पहिला अभ्यासक्रम आहे. ऑनलाइन माध्यमातून हा अभ्यासक्रम चालवला जाणार आहे.
या अभ्यासक्रमामुळे नवउद्यमीची संकल्पना प्रत्यक्षात येण्यास मदत होणार आहे, असे विद्यापीठाच्या सेंटर फॉर इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड एंटरप्राइजच्या संचालिका डॉ. अपूर्वा पालकर यांनी सांगितले.