विविध स्पर्धा परीक्षा, आंदोलन, शासकीय सुटी या पार्श्वभूमीवर घेतला निर्णय
पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बॅकलॉग व अंतिम वर्षाच्या नियमित विद्यार्थ्यांची परीक्षा ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार होती. याच कालावधीत यूपीएससी, नेट, सीईटी, एमपीएससी आदी परीक्षा होत आहेत. त्यामुळे विद्यापीठाने परीक्षेचे फेरनियोजन करीत एक आठवडा परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आता 12 ऑक्टोबरपासून बॅकलॉग व अंतिम वर्ष विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येणार आहे.
विद्यापीठाच्या परीक्षा विभागामार्फत बॅकलॉग व अंतिम वर्ष विद्यार्थ्यांची परीक्षा 5 ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे नियोजन केले होते. मात्र ऑक्टोबर महिन्यात 1, 5 व 9 या दिवशी नेट परीक्षा आहे. 4 ऑक्टोबर रोजी केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा आहे. 11 ऑक्टोबरला राज्य सेवा पूर्व परीक्षा आहे. त्यातच शासकीय सुटी आहे. तर दुसरीकडे विद्यापीठातील कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी विद्यापीठाने 11 ऑक्टोबरपर्यंत परीक्षा घेण्याचे टाळले आहे.
पूर्व परीक्षेची तारीख…
बॅकलॉग व अंतिम वर्ष विद्यार्थ्यांच्या परीक्षेपूर्वी 6 ते 9 ऑक्टोबर रोजी विद्यार्थ्यांची सराव परीक्षा घेण्यात येणार आहे, अशी माहिती परीक्षा व मूल्यमांपन मंडळाचे संचालक महेश काकडे यांनी दिली.
परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध करा
विद्यापीठ अनुदान आयोगाने विद्यापीठांना 30 ऑक्टोबरपर्यंत विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार विद्यापीठामार्फत पुढील महिन्यात परीक्षा घेण्यात येणार आहे. मात्र अजूनही परीक्षेचे वेळापत्रक अधिकृतरीत्या प्रसिद्ध करण्यात आलेले नाही. त्यामुळे “आमची परीक्षा कोणत्या तारखेला आहे, याची माहिती अद्याप प्राप्त होत नाही. त्यामुळे विद्यापीठाने परीक्षेचे वेळापत्रक लवकर जाहीर करावे’, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.