पुणे (प्रभात वृत्तसेवा) – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या दूरशिक्षण अभ्यासक्रमांचे पदव्युत्तरच्या प्रथम वर्षासाठी प्रवेश उद्यापासून (दि.21) सुरू होत आहे. पदव्युत्तरच्या एमए आणि एमकॉम या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करण्यास 21 ऑगस्ट ते 21 सप्टेंबर असा एक महिन्याचा कालावधी आहे, अशी माहिती विद्यापीठाच्या मुक्त अध्ययन प्रशाळेचे संचालक डॉ. संजीव सोनवणे यांनी दिली.
विद्यापीठाच्या मुक्त अध्ययन प्रशाळा विभागामार्फत यंदाच्या शैक्षणिक वर्षात दूरस्थ शिक्षणपद्धतीने एमए आणि एमकॉम या अभ्यासक्रमाचे प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना मुक्त अध्ययन प्रशाळेच्या संकेतस्थळावरून नोंदणी करून ऑनलाईन अर्ज करावे लागेल. विभागामार्फत यापूर्वीच पदवीच्या बीए आणि बीकॉम प्रथम वर्ष अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू झाले आहेत. पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्टपर्यंत आहे.
पदवी व पदव्युत्तरच्या प्रथम वर्षासाठी विद्यापीठ आणि महाविद्यालयात काही विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही. असे विद्यार्थी दूरशिक्षण अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षास प्रवेश घेतात. त्यानंतर दुसऱ्या वर्षी दूरशिक्षणचे प्रवेश रद्द करून नियमित महाविद्यालयात प्रवेश घेण्याचा विचार करतात. मात्र दूरशिक्षणातून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना यूजीसीच्या नियमानुसार दुसऱ्या वर्षात महाविद्यालयात प्रवेश घेता नाही, असेही डॉ. संजीव सोनवणे यांनी स्पष्ट केले आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर आता दूरशिक्षण अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची मानसिकता निर्माण झाली आहे. त्यामुळे यंदा दूरशिक्षण अभ्यासक्रमाद्वारे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. आता विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तरच्या प्रथम वर्षाचे प्रवेशास विद्यार्थ्यांचा कसा प्रतिसाद मिळेल, हेच आता पाहावे लागणार आहे.