विद्यापीठात दुचाकी वाहनांना बंदी?

-महापालिकेचे विद्यापीठ प्रशासनास पत्र
– अंतर्गत भागात सायकल वापरास प्राधान्य देण्याची विनंती
– वाढते वायु, ध्वनी प्रदूषण लक्षात घेता सुचविली उपाययोजना
– विद्यापीठाकडून सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्‍वासन
 
पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात येणाऱ्या दुचाकी वाहनांना बंदी घालण्यात यावी, तसेच विद्यापीठात येणारे विद्यार्थी आणि अभ्यंगतांनी प्रवेशव्दारापासून आतमधील परिसरात केवळ सायकल वापरावी, असे पत्र महापालिका प्रशासनाकडून विद्यापीठास देण्यात आले आहे.

शहरात वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात वायु आणि ध्वनी प्रदूषण होत आहे. विद्यापीठात येणाऱ्या वाहनांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. ही बाब लक्षात घेऊन विद्यापीठाच्या परिसरात सायकल वापरला प्रोत्साहन देण्यासाठी या निर्णयाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी महापालिकेने या पत्रात केली असल्याची माहिती पालिकेच्या सायकल विभागाचे प्रमुख नरेंद्र साळूंके यांनी दिली. दरम्यान, विद्यापीठ प्रशासनाकडून याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्‍वासन देण्यात आले असल्याचेही ते म्हणाले.

शहरातील काही ठराविक भागांतच मोठ्या प्रमाणात वृक्षसंपदा आहे. त्यात पुणे विद्यापीठाचाही समावेश आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत विद्यापीठाच्या परिसरात येणाऱ्या दुचाकी वाहनांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. त्यामुळे या भागातही वायु प्रदूषण वाढत आहे. ही बाब लक्षात घेऊन भविष्यात होणारे गंभीर परिणामांना आळा घालण्यासाठी विद्यापीठात येणाऱ्या दुचाकींना बंदी घालून परिसरात फिरण्यासाठी सायकलचा वापर करणे बंधनकारक केल्यास मोठी मदत होणार आहे. प्रामुख्याने विद्यार्थ्यांकडूनच दुचाकी वापरल्या जातात. त्यामुळे त्यांनी सायकल वापरल्यास प्रदूषण कमी होईल. त्यासाठी आवश्‍यक असलेल्या सायकली महापालिका उपलब्ध करून देण्यास तयार असून त्यानुसार, विद्यापीठाकडून याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती महापालिकेने या पत्रात केली असल्याचे साळूंके यांनी स्पष्ट केले.

मोफत सायकलींचा अनुभव वाईट

महापालिकेच्या सायकल विभागाकडून विद्यापीठास याबाबत विनंती करण्यात आली असली तरी, अवघ्या आठ ते दहा महिन्यांपूर्वी स्मार्ट सिटीकडून “ओफो’ कंपनीच्या मोफत सायकली विद्यार्थी तसेच कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. मात्र, त्यांची मोडतोड, चोरी या प्रकारांमुळे पुणे विद्यापीठानेच ही योजना बंद करावी, अशी विनंती स्मार्ट सिटीला केली होती. त्यामुळे हा अनुभव पाठीशी असताना, विद्यापीठ प्रशासन सायकलबाबत काय निर्णय घेणार यावर विद्यापीठातील दुचाकी वाहनांना बंदी घालण्याचा निर्णय अवलंबून असणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.