पुणे – ‘आयुर्वेदातील शल्य आणि शालाक्यतंत्र विषयांतील पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या डॉक्टरांना शस्त्रक्रिया करता येण्यासंबंधी सुस्पष्टता देणारे जे “गॅझेट’ केंद्राने प्रसिद्ध केले आहे. त्याला विरोध करून “इंडियन मेडिकल असाेसिएशन’ (आयएमए) सारखी संघटना निष्कारण संभ्रम निर्माण करत आहे,’ असा आरोप “महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन’ यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला आहे.
यावेळी “महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीन’चे अध्यक्ष डॉ. आशुतोष गुप्ता, कौन्सिलचे सदस्य डॉ. सुनील आवारी, डॉ. बाळासाहेब हरपळे, डॉ. अनुपमा शिंपी, डॉ. मंदार रानडे, डॉ. विक्रांत पाटील आणि डॉ. सुकुमार सरदेशमुख आदी उपस्थित होते.
“गेल्या 40 वर्षांपेक्षा अधिक वर्षांपासून शल्य आणि शालाक्यतंत्रातील पदव्युत्तर शिक्षणामध्ये सुश्रुताचार्यांने वर्णिलेले शस्त्रक्रिया, त्याचे पूर्व आणि पश्चात कर्म हे शिक्षणामध्ये समाविष्ट आहे. तसेच काळानुरूप आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन आवश्यक बदल स्वीकारून त्या शस्त्रक्रिया देश, राज्यातील विविध आयुर्वेदीय शैक्षणिक संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात यशस्वी केल्या जातात,’ असे या सदस्यांचे म्हणणे आहे.
या कायद्याला स्थगिती देण्यासंदर्भात “आयएमए’ ने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती देण्यासाठी स्पष्टपणे नकार दिला आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानेही याबाबत “आयएमए’ ची याचिका फेटाळली असताना काहीतरी नव्याने परवानगी देण्यात आली आहे. या डॉक्टरांना कसे प्रशिक्षण मिळेल त्यांची गुणवत्ता काय असेल? अशा पद्धतीचे प्रश्नचिन्ह निर्माण करून सदर राजपत्राच्या बाबतीत नागरिकांना संभ्रमित करून आणि शस्त्रक्रियेच्या अधिकाराबाबत आणि प्रशिक्षणावर प्रश्नचिन्ह निर्माण करून “आयएमए’ने शस्त्रक्रियेबाबतीत एकाधिकारशाही निर्माण करण्याचा प्रयत्न दुर्दैवी आहे, अशी प्रतिक्रियाही सदस्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
एकदिलाने काम करण्याचे आवाहन
प्रत्येकवेळी संप, काम बंद आंदोलन, निदर्शने यांचा वापर करून सामान्य जनतेला वेठीला धरण्याचा “आयएमए’ कडून जो प्रयत्न सुरू आहे, तोही समाजहिताच्या दृष्टीने अनुचित आहे. कोणत्याही शास्त्राच्या एकाधिकारासाठी संघर्ष करण्यापेक्षा सामान्य माणसाला उत्तमोत्तम आरोग्य सेवा देण्यासाठी एकदिलाने काम करणे आवश्यक आहे. या दृष्टीने सकारात्मक विचार करावा, असे आवाहनही “महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन’च्या सदस्यांनी “आयएमए’ ला केले आहे.