इंदापुरातील सणसर गावातील तरुणांचा अनोखा आदर्श
भवानीनगर – इंदापूर तालुक्यातील एकमेव गाव असे असेल की, या गावातील सर्व पक्षाचे तरुण कार्यकर्ते एकत्र येऊन एकमेकांशी गप्पा मारत चहाचा आस्वाद घेताना दिसत आहेत. ते गाव आहे.., इंदापूर तालुक्यातील सणसर गाव. राजकीय हेवेदावे कितीही असू देत, केवळ राजकारणासाठी आम्ही आमची मैत्री का तोडावी, असा सवाल करीत एकीचा संदेश या सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या वागण्यातून दलबदलू नेते आणि कार्यकर्त्यांना दिला जात आहे.
इंदापूर तालुक्यातील सणसर हे गाव राजकीयदृष्ट्या फार संवेदनशील आणि महत्त्वाचे मानले जाते. इंदापूर तालुक्याचा आमदार निवडून आणण्याची आणि पाडण्याची क्षमता या गावावर असल्याने सर्वच पक्षांच्या नेत्यांचे, उमेदवारांचे या गावावर कायम बारीक लक्ष असते. या गावांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष, भाजप, शिवसेना, कॉंग्रेस, रासप, आरपीआय, स्वाभिमानी अशा सर्वच पक्षाचे तरुण कार्यकर्ते आहेत. परंतु, हे सर्व कार्यकर्ते राजकीय जोडे बाजूला ठेवून व आपापल्या पक्षाचे ध्येय धोरणे बाजूला करीत रोज एकत्र येत विचारांची देवाण-घेवाण करतात. आपल्या सगळ्या मित्रांना सामावून घेत राजकारण विरहित मैत्री जपण्याचे काम हे सर्वजण करीत आहेत. हे सर्व मित्र एकत्र मिळून रमेश काटकर यांच्या नामांकित असलेल्या आर्या या हॉटेलवर जमा होऊन गुळाचा चहा पित आपल्या निखळ मैत्रीचा आनंद घेतात.
विधानसभेची निवडणूक तोंडावर आलेली असताना व इंदापूर तालुक्यात भारतीय जनता पार्टी, शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष यांच्यामध्ये चढाओढ असताना देखील सणसर येथील सर्व पक्षाचे कार्यकर्ते मात्र अद्यापही एकाच धाग्यात बांधले गेलेले आहेत तो धागा म्हणजे मैत्री. राजकारण विरहित मैत्री कशी असावी, याचा अनुभव घ्यायचा असेल तर सणसर गावच्या तरूण कार्यकर्त्यांना भेटा, असेही अनेक जण आता सांगू लागले आहेत. राजकीय वातावरण तेवढ्यापुरते मर्यादित ठेवून पुन्हा सर्वजण एकत्र येत असल्याने सर्व पक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यात हा चर्चेचा विषय झाला आहे.
या तरुणांमध्ये विद्यमान सरपंचाचे पती, उपसरपंच, माजी उपसरपंच, सदस्य, सोसायटीचे माजी अध्यक्ष, सर्व सदस्य तसेच सर्व पक्षातील कार्यकर्ते आहेत. कोणतेही हेवेदावे न करता मैत्री कशी जपावी, याचे धडे हे सर्वजण देत आहेत. आपापली मते मांडून एकमेकांशी आपल्या पक्षाबद्दल तात्विकदृष्ट्या भांडणही मैत्री टिकवली जात आहे. तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील कार्यकर्त्यांसाठा हे एक सर्वोत्तम उदाहरण मानले जात आहे.