इमा राडकानूचा सनसनाटी विजय
पुणे: एनइसीसी डेक्कन आयटीएफ महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत दुसऱ्या फेरीत ग्रेट ब्रिटनच्या इमा राडकानू हिने मानांकित खेळाडूवर सनसनाटी विजय मिळवत आजचा दिवस गाजवला. तर, श्रीवल्ली रश्मिका भामिदीप्ती हिला पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे एकेरीतील भारतीय खेळाडूंचे आव्हान संपुष्टात आले आहे.
या स्पर्धेत एकेरीत मुख्य ड्रॉमध्ये दुसऱ्या फेरीत क्वालिफायर ग्रेट ब्रिटनच्या इमा राडकानू हिने आपली विजयी मालिका कायम ठेवत नॉर्वेच्या उलरिके एकेरीचा 6-3, 6-0 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. थायलंडच्या क्वालिफायर पुनिन कोवा पिटुक्टेड हिने वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केलेल्या भारताच्या श्रीवल्ली रश्मीका भामिदीप्तीचे आव्हान 6-3, 6-4 असे संपुष्ठात आणले.
रशियाच्या ओल्गा दोरोशिना हिने लतवीयाच्या डायना मर्सिंकेविकाचा टायब्रेकमध्ये 4-6, 7-6(5), 6-2 असा संघर्षपूर्ण पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदविला. पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या जपानच्या सातो नाहोने थायलंडच्या नुदनिदा लुआंगनामचा टायब्रेकमध्ये 6-3, (4)6-7, 6-0 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. ऑस्ट्रेलियाच्या ऍलिसिया स्मिथ हिने इटलीच्या कोरिना डेंटोनीला 6-3, 7-6(3) असे पराभूत करून आगेकूच केली.