वॉशिंग्टन- अमेरिकेने मेक्सिकोला जोडली जाणारी आपली दक्षिण सीमारेषा सर्व अनावश्यक प्रवासासाठी कालपासून बंद केली आहे. अमेरिका-कॅनडा सीमारेषा याआधीच गेल्या मंगळवारपासून बंद केली आहे. सीमाभागातील रहिवासी आणि शरणार्थ्यांमध्ये करोनाची साथ पसरू नये यासाठी मेक्सिकोच्या सीमेवरही तशीच गरज असल्याने हे पाऊल उचलण्यात आल्याचे ट्रम्प प्रशासनाने म्हटले आहे. अनावश्यक प्रवासाचे मार्ग जरी बंद करण्यात आले असले, तरी, अमेरिका आणि मेक्सिकोदरम्यानचा व्यापार यापुढेही सुरूच राहिल, असे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पेओ यांनी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांना सांगितले.
कोविड-19 च्या संसर्गाने अमेरिकेत आत्तापर्यंत 230 जणांना प्राण गमवावे लागले असून 18 हजार हून जास्त रुग्णांना याची लागण झाली आहे. न्यूयॉक, वॉशिंग्टन आणि कॅलिफोर्निया या प्रमुख शहरांत रुग्णांची संख्या जास्त आहे. अमेरिकेने कर भरण्याची अंतिम तारीख 15 एप्रिलहून 15 जुलैपर्यंत पुढे ढकलली आहे.