रोहिंग्यांच्या हत्येचा ठेवला ठपका
वॉशिंग्टन – रोहिंग्य मुस्लिमांची हत्या आणि त्यांचा छळ केल्याच्या कारणावरून अमेरिकेने म्यानमारचे लष्करप्रमुख आँग हलैंग, उपलष्कर प्रमुख सोई विन, ब्रिगेडियर जनरल थॅन ऊ, आणि अन्य वरीष्ठ लष्करी अधिकाऱ्यांवर निर्बंध जारी केले असून त्यांच्यावर अमेरिका प्रवेशाची बंदी लागू केली आहे. ही बंदी तातडीने अंमलात येणार असून या लष्करी अधिकाऱ्यांच्या कुटुंबियावरही ही बंदी लागू राहणार आहे.
या अधिकाऱ्यांनी मानवाधिकाराचे उल्लंघन केल्याचे सबळ पुरावे मिळाल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे असा दावा अमेरिकेने केला आहे. अमेरिकेने या आधी सन 2018 मध्ये दोन अधिकाऱ्यांच्या विरोधात अशीच कारवाई केली होती. रोहिंग्यांच्या विरोधात अशी भूमिका घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची सुचना अमेरिकेन म्यानमारच्या सरकारकडे केली होती. पण सरकारनेही त्याकडे दुर्लक्ष केले.
मात्र अजूनही तेथे रोहिंग्यांवर अत्याचार सुरूच असल्याचे निरीक्षणही अमेरिकेने नोंदवले आहे. रोहिंग्यांना ठार मारल्याच्या आरोपांवरून ज्या सैनिकांना अटक करण्यात आली होंती त्यांच्या सुटकेचे आदेश लष्करप्रमुखांनी दिल्यामुळे म्यानमारचे लष्करी नेतृत्व मानवाधिकाराच्या बाबतीत विश्वासार्ह नाही याची खात्री पटली आहे. त्यामुळेच आम्हाला हा निर्णय घेणे भाग पडले आहे असे अमेरिकेने म्हटले आहे.