प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 28 – राजमुद्रा ढोल ताशा पथकाने यंदाच्या वर्षी मानव्य संस्थेला आर्थिक मदत करून अनोखे “वाद्यपूजन’ केले. गेल्या 17 वर्षांपासून पुण्याबरोबर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आपली शिस्तबद्ध पद्धतीने कला सादर करत आहे. यातून मिळणाऱ्या उत्पनातील खर्च वजा जाता काही वाटा समाजातील गरजू घटकांच्या मदतीसाठी दरवर्षी उपयोगात आणत आहेत.
यावर्षीही राजमुद्रा पथकाने वाद्य पूजन समारंभ अनोख्या पद्धतीने केले म्हणजे त्यांनी वाद्यपूजन आणि सराव शुभारंभासाठी येणारा खर्च करण्याऐवजी तो मानव्य या एड्सबाधित अनाथ रुग्णांसाठी काम करणाऱ्या संस्थेला आर्थिक मदत केली. याप्रसंगी अभिनेता आरोह वेलणकर, सूरज थोरात आणि संकेत मते आदी उपस्थित होते.
पथकातील सर्व वादकांनी या ठिकाणी भेट दिली. येथील मुलांसोबत आरोहने चित्रपट माध्यमातील अनेक गंमती जमती सांगितल्या. पथकाच्या सराव शुभारंभाचा खर्च हा अनेक मुलांच्या काही महिन्यांच्या मूलभूत गरजा भागवण्याचा कामी येणार आहे. हा आदर्श अन्य पथकांनी घ्यावा, असे आवाहन राजमुद्रा पथकाने केले आहे. पथक प्रमुख मयूर उत्तेकर यांनी स्वागत, तर अनिकेत ठोंबरे यांनी मनोगत मांडले.