2 लाख कर्मचारी आणि कुटुंबीयांचा सहभाग
पुणे – करोनाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेकडून रेल्वे परिवार देखरेख मोहीम राबवण्यात येत आहे. यामध्ये दोन लाखांहून अधिक रेल्वे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांनी सहभाग नोंदवला आहे.
रेल्वे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांची चिंता दूर करण्यासाठी मध्य रेल्वेने ही मोहीम सुरू केली आहे. या अभियानांतर्गत सर्व कर्मचाऱ्यांशी नियमित संपर्क साधणे, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची नोंद ठेवणे, सहकार्य करणे आदींचा समावेश आहे. यांतर्गत रेल्वेच्या प्रत्येक कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला असून, मॅपिंग केले आहे. यामुळे आपत्कालीन परिस्थितीत त्यांच्यापर्यंत लवकर पोहोचण्यास मदत होणार आहे.
मध्य रेल्वेच्या मुंबई, पुणे, सोलापूर, नागपूर आणि भुसावळ या विभागांतील सुमारे 93 हजार कर्मचारी आणि कुटुंबातील 1 लाखांपेक्षा अधिक सदस्यांनी आरोग्य सेतु ऍप डाऊनलोड केले आहे. करोना विषयक खबरदारी आणि उपाययोजनांची माहिती देण्यात येत आहे. याशिवाय, कॉलनी केअर समित्या कार्यान्वित केल्या आहेत. कर्मचारी आणि संघटनांची मदतीने स्थानिक समित्या स्थापन केल्या असून, त्याद्वारे कर्मचाऱ्यांच्या गरजांकडे लक्ष देण्यात येत असल्याचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल, मुख्य कार्मिक अधिकारी डॉ. ए. के. सिन्हा यांनी सांगितले.