रक्तदानासाठी लढविली अनोखी शक्‍कल!

सोलापुरात सामाजिक उपक्रमाला मिळाला भरघोस प्रतिसाद

सोलापूर (प्रतिनिधी) – रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. लोकांनी रक्तदान करण्यासाठी पुढे यावे यासाठी सामाजिक संस्थाकडून विविध उपक्रम राबवले जातात. सोलापुरात मात्र रक्तदान करणाऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी एक अनोखी शक्कल लढवण्यात आली. रक्तदान करणाऱ्यांना चक्क पाच लीटर पेट्रोल भेट देण्यात येत असल्याने या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळाला.

सोलापुरातील सिद्धेश्वर हायवे सेंटर पेट्रोल पंपातर्फे दिवंगत गिरीश सतीश जम्मा यांच्या सन्मानार्थ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदानाचे शिबीर भरवल्यानंतर एरवी लोक त्याकडे पाठ फिरवतात. जाहिरातबाजी केल्यानंतरही रक्तदान शिबिरास हवा तसा प्रतिसाद मिळत नाही. म्हणून ही अनोखी शक्कल लढवण्यात आली आहे. रक्तदान करणाऱ्या व्यक्तींना पाच लीटर पेट्रोल मोफत मिळत असल्याने सोलापुरातील लोकांनी या ठिकाणी रक्तदान करण्यासाठी लांबच लांब रांगा लावल्याचे दिसत आहेत.

रक्तदान केल्यानंतर लोक थेट गाडीत पेट्रोल भरून घेत होते. तर काहींनी पेट्रोलसाठी चक्क डबे सोबत आणले होते. अवघ्या काही तासात 700 लोकांनी रक्तदान केल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. प्रलोभन दाखवून रक्तदान करवून घेणे कायद्याने गुन्हा आहे. असं असली तरी प्रोत्साहन म्हणून रक्तदात्याला भेट वस्तू दिली तर त्यात गैर काय?, असे रक्तदान करण्यासाठी आलेल्या काही लोकांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.