केंद्रीय मंत्र्यांनी स्वीकारले आपापल्या खात्याचे पदभार

नवी दिल्ली- मोदी सरकारच्या नवीन मंत्रिमंडळाचे खातेवाटप झाल्यानंतर बहुतेक सर्व मंत्र्यांनी आपापल्या खात्यांची जबाबदारी आज स्वीकारली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्यावर दाखवलेला विश्‍वास सार्थ करून दाखवण्याचा विश्‍वास या मंत्र्यांनी व्यक्‍त केला आहे.

केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थ आणि कंपनी व्यवहार मंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला. अर्थ आणि कंपनी व्यवहार राज्यमंत्री अनुराग सिंग ठाकूर, आणि वरिष्ठ सचिवांनी सीतारामन यांचे स्वागत केले. निर्मला सीतारामन या देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री आहेत.

निर्मला सीतारामन यांनी आधीच्या सरकारमधे संरक्षण मंत्री म्हणून काम केले आहे. सीतारामन या कर्नाटकातून राज्यसभेवर निवडून आल्या आहेत. नवी दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.

प्रकाश जावडेकर यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून काम करण्याची पुन्हा एकदा संधी मिळाल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. लोकशाही व्यवस्थेत प्रसार माध्यमांची भूमिका महत्वाची असते, असे सांगत प्रसार माध्यमांच्या स्वातंत्र्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असा पुनरुच्चार त्यांनी केला. लोकशाही व्यवस्था सुदृढ राहण्यासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र महत्वाचे आहे, असेही ते म्हणाले.
आपल्या आधीच्या मंत्र्यांनी या खात्यासाठी केलेल्या कामांचे त्यांनी कौतुक केले. यावेळी जावडेकरांनी मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी तसेच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या विविध विभागांच्या प्रमुखांची भेट घेतली. सर्वांनी एक चमू म्हणून काम करावे असा सल्ला त्यांनी दिला.

संतोष कुमार गंगवार यांनी आज श्रम आणि रोजगार मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) म्हणून पदभार स्वीकारला. या मंत्रालयाची जबाबदारी पुन्हा एकदा सोपवल्याबद्दल गंगवार यांनी पंतप्रधानांचे आभार मानले. आधीच्या कार्यकाळात कामगारांचे कल्याण आणि सामाजिक सुरक्षेसाठी आपल्या मंत्रालयाने महत्वाचे निर्णय घेतले. ही प्रक्रिया पुढेही चालू ठेवणार असल्याचे ते म्हणाले. प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेची अंमलबजावणी लवकरात लवकर पूर्ण करु, असेही त्यांनी सांगितले. गंगवार यंदा आठव्यांदा खासदार म्हणून निवडून आले आहेत. यांना केंद्रीय मंत्रालयांमधल्या अनेक खात्यांच्या मंत्री पदाचा प्रदीर्घ अनुभव आहे.

केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी आज वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला. माजी वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यावेळी त्यांच्यासोबत होते. सुरेश प्रभू यांच्यासारख्या द्रष्ट्‌या नेत्याकडून हा कार्यभार स्वीकारतांना आपल्याला अतिशय आनंद होत आहे, अशा भावना गोयल यांनी व्यक्त केल्या. या विभागाच्या प्रगतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करु अशी ग्वाही त्यांनी दिली. उद्योग आणि व्यापार क्षेत्रात तातडीने लक्ष घालण्याच्या मुद्यांवर अभ्यास करु असे गोयल यावेळी म्हणाले.


शिवसेना नाराज नाही…

मंत्रिमंडळामध्ये शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांच्याकडे अवजड उद्योग खात्याचे मंत्रीपद सोपवण्यात आले आहे. 18 खासदार जिंकूनही शिवसेनेला कमी महत्वाचे खाते दिले गेल्याबद्दल शिवसेनेमध्ये नाराजी असल्याची भावना आज व्यक्‍त व्हायला लागली होती. यापूर्वी मनोहर जोशी आणि अनंत गिते या शिवसेनेच्या नेत्यांकडे हेच अवजड उद्योगाचे खाते सोपवण्यात आले होते. मात्र शिवसेनेमध्ये अशी कोणतीच नाराजी नसल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सांगितले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×