नवी दिल्ली – गोव्यातील सिली सोल्स कॅफे आणि बार प्रकरणातील आरोपांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी कॉंग्रेस नेते पवन खेरा, जयराम रमेश आणि नेटा डिसूझा यांना नोटीस बजावली आहे. त्यांनी बिनशर्त माफी मागावी असे त्यांना त्याद्वारे सांगण्यात आले आहे.
गोव्यातील हा बार स्मृती इराणी यांची मुलगी चालवत असल्याचा दावा आणि आरोप काल कॉंग्रेस नेत्यांकडून करण्यात आला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. इराणी यांनी कालच या आरोपांचे खंडन केले आहे. या नेत्यांनी आरोप मागे घ्यावेत आणि बिनशर्त माफी मागावी असे नोटीशीत म्हटले आहे.
नेटा डिसूझा या कॉंग्रेसच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा आहेत. तर अन्य दोन नेते केंद्रीय नेते आहेत. दरम्यान, रविवारी गोव्यातील कॉंग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांनी या बारच्या बाहेर निदर्शनेही केली.
इराणी यांच्या मुलीवर गंभीर आरोप करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणी यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणीही कॉंग्रेसने केली आहे. तर आपली 18 वर्षांची मुलगी कॉलेजच्या प्रथम वर्षात शिकते आणि तिचा या बारशी काहीही संबंध नसल्याचे इराणी यांनी कालच म्हटले होते.